
कन्नडजवळ हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला मृत्यू…
अमळनेर:- अमळनेर येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत सखाराम महाराज देवस्थानच्या दिंडीतील एका वारकऱ्याचा रविवारी नागापूर (ता. कन्नड) जवळ हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
सुरेश केशवराव कुलकर्णी (वय ६३, रा. अकोला, ह. मु. पुणे) असे मयत वारकऱ्याचे नाव आहे. अमळनेर येथील संत सखाराम महाराज देवस्थानची पायी दिंडी हभप. प्रसाद महाराजांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली आहे. ही दिंडी नागदजवळील बेलखेडा गावी शनिवारी मुक्कामी होती. तेथून रविवारी नागापूरकडे जात असताना सकाळी किल्ले अंतुरच्या जुन्या पायवाटेवर वारकरी सुरेश कुलकर्णी यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना तत्काळ इतर वारकऱ्यांनी बेशुद्धावस्थेत नागापूर येथे आणले. तेथून कन्नड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी पुणे येथे पाठविण्यात येणार आहे. कुलकर्णी हे अकोला येथील रहिवासी असून ते सध्या पुण्यात राहतात. ते दिंडीत ५ जूनपासून पहिल्या दिवसापासून सहभागी झाले होते. त्यांची ही तिसरी वारी होती. मात्र, काळाने मध्येच त्यांच्यावर घाला घातल्याने भाविकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.







