
लोणतांडा येथील दोन भावांच्या घराला आग लागून झाले नुकसान…
अमळनेर:- शहरातील अग्निशमन दलाच्या इमारतीला आग लागून आरोग्य विभागाचे कागदपत्र जळून खाक झाले तर तालुक्यातील लोण तांडा येथील दोघा भावांच्या घराला आग लागून अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दिनांक १२ जून रोजी रात्री अचानक अग्निशमन दलाच्या इमारतीला आग लागली. इमारतीच्या आरोग्य विभागातील कपाट आणि साहित्य जळून खाक झाले. नितीन खैरनार, फारुख शेख ,उस्मान शेख , दीपक बिऱ्हाडे यांनी आग विझवली. सुदैवाने आग लागल्याचे लवकर लक्षात आले अन्यथा वरच्या मजल्यावर राहणाऱ्या अग्निशमन दलाचे कर्मचारी धोक्यात आले असते. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या आदेशाने आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण यांनी अमळनेर पोलिसात खबर दिल्यावरून आगीची नोंद करण्यात आली आहे.
दिनांक १३ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास लोण तांडा येथील सरदार कोळजी चव्हाण व आप्पा कोळजी चव्हाण या दोन्ही भावांच्या घरावरून विद्युत तार गेलेले असल्याने वादळाने तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन ठिणगी पडली. घराच्या छतावर आग लागल्याने आधी घरातील लोकांना काहीच समजले नाही. आग मोठी झाल्यावर अचानक धावपळ सुरू झाली आणि घरातील लोक बाहेर पडले. चारा आणि घरगुती साहित्य जळून खाक झाले आहे.सुमारे ४० ते ५० हजाराचे साहित्य जळून खाक झाले आहे. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. नितीन खैरनार, जफर पठाण, आंनदा झिम्बल, फारुख शेख यांनी आग विझवण्यासाठी मदत केली.







