
“काळ आला होता, पण वेळ आली नव्हती” म्हणीचा आला प्रत्यय…
अमळनेर:- बऱ्याचदा “काळ येतो पण वेळ आलेली नसते” आणि त्यामुळे आलेले संकट टळते मात्र आलेली ती वेळ प्रचंड मोठा धक्का देऊन जाते,असाच प्रत्यय अमळनेर येथील सोमाणी कुटुंबियांना आला असून अतिशय मोठ्या अपघातातुन संपुर्ण कुटुंबच बचावल्याने भगवंताचीच ही कृपा असल्याचे बोल नातलग व हितचिंतकांच्या मुखातून बाहेर पडत आहे.
सदर अपघातात संपुर्ण उध्वस्त झालेल्या चारचाकीचे रूप पाहिल्यास कुणालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही मात्र भगवंताची अनुभूतीच आम्हाला यातून आली असे सांगून सोमाणी कुटुंबियानी या घटनेची आपबीती कथन केली. अमळनेर प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक प्रा.सुभाषचंद्र सोमाणी हे मोठ्या मुलाकडे आपल्या हुंडाई एक्सेन्ट कारने कार्यक्रमानिमित्त मुंबई येथे गेले होते. सोबत त्यांच्या पत्नी लता सोमाणी व मुलगा तथा बाजार समितीचे व्यापारी रोशन सोमाणी हे देखील होते. कार्यक्रम आटोपून मुंबई येथून अमळनेरकडे सहकुटुंब ते परतत असताना रोशन सोमाणी हे द्रायव्हिंग करीत होते. रात्री ११ वाजता चांदवड घाटात ते पोहोचले असता मागून आलेल्या आयशर गाडीने त्यांना मागून जोरदार धडक दिली ही धडक एवढी जोरात होती की त्यांची गाडी जागेवर गोल फिरून पुन्हा त्याच आयशर ला पुढूनही जोरात धडकली यामुळे गाडी दोन्ही बाजूने दाबली जाऊन गाडीची अवस्था एकदम वाईट झाली. एवढा मोठा अपघात असताना आयशर चालक मात्र तेथून पसार झाला,हा अपघात पाहून मागून आलेल्या गाड्या त्वरित तेथे थांबल्या, गर्दी वाढल्याने जोमाने मदतकार्य सुरू झाले. बाहेरुन गाडीची अवस्था पाहून कुणीही जिवंत नसेल अशी अनेकांची खात्री झाली होती. काहींनी दार उघडण्याचा प्रयत्न केला असता ते लॉक झाल्याने उघडत नव्हते अखेर पुढील काच व खिडकीची काच फोडून तिघांना बाहेर काढण्यात आले,सुदैवाने तिन्ही जण सुखरूप पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला,केवळ प्रा सोमाणी याना डोक्याला व पायाला किरकोळ मार बसला तर त्यांच्या पत्नी व मुलाला देखील किरकोळ लागले होते,यावेळी उपस्थितांच्या माणुसकीचे दर्शन सोमाणी कुटुंबियांना झाले. तातडीने एम्ब्युलन्स बोलवून तिघांना चांदवड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले,तेथे रात्रभर उपचार करून सकाळीच त्यांची सुट्टी करण्यात आल्यानंतर ते अमळनेरात घरी परतले. दोन दिवसात अनेक हितचिंतकांनी सोमाणी कुटुंबियांची भेट घेतली असता आम्ही आलेला काळ डोळ्यांनी पहिला मात्र काहीतरी पुण्यकर्म आडवे आल्याने भगवंतानेच ती वेळ थांबवली अश्या भावना त्यांनी प्रत्येकाजवळ व्यक्त केल्या आहेत.







