
अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दांडी, स्थानिक जनाधार नसल्याचे झाले उघड…
अमळनेर:- शहरात काल राष्ट्रवादीच्या ग्रंथालय सेलचा कार्यक्रम प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. आयोजक पदाधिकारी प्रदेशस्तरावर काम करीत असले तरी स्थानिक जनाधार नसल्याचे शुक्रवारी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात दिसून आले. अनेक स्थानिक कार्यकर्त्यांना ही विश्वासात न घेता कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. स्थानिक पातळीवर कोणताही जनाधार नसल्याने नेत्यांना गोलमाल करीत कार्यक्रम झाला. नियोजनाचा अभाव, सुरक्षेकडे दुर्लक्षामुळे चोरट्यांनी तब्बल ४६ जणांवर हातसफाई करीत चोरटे मालमाल झाले.
अमळनेरात ग्रंथालय सेलच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांनी हजेरी लावली. मात्र कार्यक्रमाला तालुक्याबाहेरील पदाधिकाऱ्यांचीच गर्दी अधिक दिसून आली. पक्षाच्या प्रदेश स्तरावर काम करणाऱ्या नेत्यांना स्थानिक पातळीवर जनाधार नाही, फक्त नेत्यांशी ओळख हेच त्यांचे भांडवल असल्याचे या संपूर्ण कार्यक्रमातून दिसून आले. कार्यक्रम आयोजित करणाऱ्या ग्रंथालय सेलच्या दोन मुख्य पदाधिकाऱ्यांचेच फोटो स्टेजवरील स्क्रीनवर झळकत होते. त्यातही स्थानिक आमदार व नेते वगळण्यात आले होते. याचा अर्थ पक्षांतर्गत मोठी दुफळी असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले. त्यामुळे आगामी निवडणुकीत याचा पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आम्हीच गुणी आणि आम्हीच ज्ञानी असा या पदाधिकाऱ्यांचा अर्विरभाव असल्याचे राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी खाजगीत सांगतात. हे सारे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निरीक्षण केल्याने त्यांच्याबाबतीत निश्चितच विचार होऊ शकतो, असे त्यांच्याच निकटवर्तीयांकडून बोलले जात आहे.







