
शिंदखेडा:- तालुक्यातील दोंडाईचा येथे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या एका दौऱ्यानिमित्त आले असता शिंदखेडा तालुक्यातील पोलीस पाटलांनी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.
या निवेदनात नमूद केले आहे की, राज्यातील पोलीस पाटलांची अतिशय दयनीय अवस्था असुन त्यांना वेळेवर मानधन तसेच अल्पशा मानधनावर काम करावे लागत आहे. सहा हजार पाचशे रुपये एवढे मानधनावर पोलीस पाटील आपला संसाराचा गाडा हाकलत असून त्यांना मुलांच्या फीसाठी शिक्षणासाठी लागणारा पैसा देखील या मानधनामुळे पुरा होत नाही घरातील एखादा पुरुष आजारी पडला तर दवाखान्याचा खर्च पेलवत नाही. 24 तास गावात सेवा देणारा पोलीस पाटलांचे चार, पाच महिने मानधन होत नाही. अतिशय तुटपुंजे मानधन देऊन पोलीस पाटलांची थट्टा केली जात आहे शेतावर काम करणाऱ्या मजुरांना चारशे रुपये मिळतो तर पोलीस पाटील फक्त दोनशे रुपये प्रति दिवस मानधननावर काम करत आहे. यामुळे पोलीस पाटील अथिक अडचणीत सापडले आहेत तरी शासनाने गांभीर्याने विचार करून पोलीस पाटलांचे मानधन वाढविण्यात यावे, या सह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यावेळी चरणसिंग गिरासे, सुरेश पाटील, कुणाल पाटील, महेंद्र पाटील, मनोहर पाटील, युवराज माळी आदी पोलीस पाटील उपस्थित होते.




