
शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याने मांडली सोशल मीडियावर व्यथा…
अमळनेर:- तालुक्यातील करणखेडे शिवारात अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मोडून वादळाने मोडून पडलेले विजेचे खांब उभारून ते पुन्हा तुटल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. याकडे लोकप्रतिनिधी व अधिकार्यांना लक्ष्य देण्यास वेळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली कैफियत सोशल मीडियावर मांडून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडून अपेक्षा व्यक्त केली आहे.
अमळनेर तालुक्यात गेल्या 28 एप्रिलला आलेल्या वादळात करणखेडे शिवारात शेतीपंपाच्या विजेचे खांब पडले. साधारण 15 दिवसापूर्वी नवीन खांब उभारले. तार जोडणी होण्याआधीच पुन्हा नवीन खांबही कोसळले. त्यामुळे अजूनही 15 ते 20 शेतकरी विजेच्या प्रतीक्षेत आहेत. गुरांना पाणी नाही, पूर्व हंगामी कापूस लागवड करता आली नाही. पावसाची धूसर शक्यता नाही आणि पाऊस आलाच तर वीजेचे खांब उभारता येणार नाहीत. सध्या जात्यात अडकलेल्या धान्यासारखी स्थिती शेतकर्यांची झाली आहे. भूमिपुत्र आमदार इतर महत्वपुर्ण कामात अतिव्यस्त असल्याने खऱ्या भूमीपुत्रांचे अर्थात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला त्यांना वेळ नाही, अशी उपरोधिक टोला ही शेतकरी लगावत आहेत. वीज वितरण कंपनी ठेकेदाराकडे बोट दाखवते आहे, आता केवळ लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडून अपेक्षा ठेवून आहोत, अशी कैफियत शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर मांडली आहे.







