
ढेकू रोडवरील शास्त्री नगरात घडली घटना, ३२ हजारांचा ऐवज लंपास…
अमळनेर:- मुलीकडे गेलेल्या दाम्पत्याच्या घरी चोरट्यानी हात साफ केला असून ३२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शहरातील ढेकू रोड भागात घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील ढेकू रोड वरील शास्त्री नगर भागात हरीचंद्र वाडेकर व प्रमिला वाडेकर हे दाम्पत्य राहते.त्यांची मुलगी सुनीता खैरनार या शहरातील मुंदडा नगर भागात राहतात. हरीचंद्र वाडेकर व त्यांची पत्नी १८ जून रोजी सायंकाळी त्यांच्या घराला कुलूप त्यांच्या मुलीकडे गेले होते.१९ जून रोजी सकाळी ७ वाजता हरीचंद्र वाडेकर सकाळी घरी परत आले असतांना त्यांना घराचे कडी-कोंडा तुटलेला आढळला. घरात तपासणी केली असता कपाटाचे लॉकर तोडून १२ हजार रुपयांची ७ ग्रॅमची सोन्याची चैन,७ हजार रुपयांची ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी,२ हजार रुपये किंमतीचे १ ग्रॅम चे कानातील दागिने,१ हजार ५०० रुपयांचे चांदीचे ब्रेसलेट,१० हजार रुपये रोख असे एकूण ३२ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञाताने घर फोडून चोरून नेला आहे. अमळनेर पोलीस स्टेशन ला अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे.कॉ.बापू साळुंखे करत आहेत.








