गुराखी, पोलिस व वन कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता…
अमळनेर:- येथील पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि वन कर्मचाऱ्यांनी वेळीच केलेल्या धावपळीमुळे जखमी झालेल्या काळवीटाचा जीव वाचून त्यास जीवदान मिळाले आहे.
अमळनेर तालुक्यातील आर्डी शिवारातील जंगलात एक काळवीट जखमी अवस्थेत पडले असल्याने गुराखी भूषण रामलाल वानखेडे या मुलाने १०० नंबर डायल करून अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मिलिंद भामरे यांना माहिती दिली,त्यांनी लागलीच पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना सदर घटनेबाबत कळवुन लागलीच वनपाल प्रेमराज सोनवणे यांनाही फोनद्वारे जखमी हरणाच्या मदतीसाठी आर्डी गावी येण्याची विनंती केली. वनपाल सोनवणे व वनरक्षक रामदास वेलसे हे तातडीने आर्डी गावी पोहोचून जखमी काळवीटचा जंगलात शोध घेऊन आधी प्रथमोपचार केले, नंतर एका खाजगी रिक्षाने अमळनेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले, त्यामुळे पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून काळवीटावर वेळीच उपचार होऊन त्याचे प्राण वाचले. यामुळे भूषण वानखेडे, पोलीस हवालदार मिलिंद भामरे, गणेश पाटील व वनपाल सोनवणे व वेलसे आदींचे सर्वांनी कौतुक केले.