
मॉक ड्रिल असल्याचे कळताच सोडला सुटकेचा निःश्वास, शहरात पोलिसांचे पथसंचलन …
अमळनेर:- काल सायंकाळी साडे चार वाजता पोलीस निरीक्षकांचा भ्रमणध्वनी वाजला आणि वीज मंडळ कार्यालयात कोणीतरी पोत्यात प्रेत टाकून सोडून गेला आहे असे फोनद्वारे सांगितल्याने अन सर्वत्र धावपळ सुरू झाली. पोते उघडले तर काय पोत्यात प्लास्टिक कचरा भरलेला होता. पोलिसांची सतर्कता आणि तत्परता तपासण्यासाठी ते मॉक ड्रिल होते असे कळताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना खुनाची बातमी कळवताच त्यांनी ताबडतोड डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांना सुभाष चौकाजवळील वीज मंडळ कार्यालयाजवळ बोलावले. डी बी पथक, बिट अंमलदार, वाहतूक पोलीस, क्राईम शाखा, गोपनीय शाखा आदी पोलिसांना तात्काळ घटनास्थळी हजर होण्याचे आदेश दिले. वीज मंडळ कार्यालयात कोणाचा तरी खून करून प्रेत पोत्यात फेकून देण्यात आले आहे. त्याचा शोध घ्यायला सांगण्यात आले. वीज कर्मचारी आणि अधिकारी गोंधळले. मुतारी च्या मागे लाल डाग पडलेले पोते सापडले.घटनेचे वृत्त समजताच पत्रकार देखील पोहचले होते. सर्वांच्या समक्ष पोते उघडण्यात आले. पोत्यात प्लास्टिक कचरा निघाला तर पोत्यावर लाल रंग टाकण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांची सतर्कता, तत्परता, संवेदनशीलता आणि गावातील नागरिकांची भूमिका तपासण्यासाठी मॉक ड्रिल असल्याचे सांगितल्यानंतर सर्वाना हसू आले. वीज मंडळ कार्यालयात मात्र कोण केव्हा पोते ठेवून याची सुतराम ही कल्पना नव्हती.
त्यांनतर सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांची भीती दूर व्हावी आणि गुन्हेगारांना कायद्याचा धाक बसावा म्हणून शहरातील गांधलीपुरा पोलीस चौकी, मोठी बाजार पेठ, सराफ बाजार, पानखिडकी, वाडी चौक,कसाली मोहल्ला, माळीवाडा, झामी चौक परिसरातून पथ संचलन करण्यात आले. यावेळी डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी, शितलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोउनि भैयासाहेब देशमुख, पोउनि विलास पाटील, पोउनि विकास शिरोळे, पोउनि अक्षदा इंगळे, विनोद पाटील, जाधव आदि अधिकारी, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस, होमगार्ड आणि तीन आरसीपी प्लाटून सहभागी झाले होते.








