
आमदार अनिल पाटील यांचा जि.प. सदस्य ते मंत्रिपदापर्यंतचा संघर्षमय प्रवास…
अमळनेर:- तरुणपणी एक गुणासाठी पीएसआय पदाची संधी हुकली मात्र आज त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, अश्या आमदार अनिल पाटील यांचा जि. प. सदस्य ते मंत्रिपदापर्यंतचा प्रवास संघर्षमय राहिला आहे.

काल रविवारी २ जुलै रोजी राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडीत आमदार अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आमदार पाटील यांचे वडील भाईदास पाटील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता होते. आई पुष्पाबाई यांना आधीपासून शेतीची आवड होती. अनिल पाटील यांनी सिम्बॉयसिस विद्यापीठात एमबीए आणि एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. एक गुणासाठी पोलीस उपनिरीक्षकपदाची संधी हुकली आणि अनिल पाटील प्रथमत ठेकेदारी व नंतर भाजप पक्षाच्या माध्यमातून राजकारणाकडे वळले. सर्वप्रथम २००२ ला कळमसरे डांगरी गटात व नंतर २००७ साली अमळगाव पातोंडा गटात जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर १० वर्षे बाजार समिती सभापती राहिले आहेत. तसेच दहा वर्षे जिल्हा बँकेचे संचालक होते आणि पुन्हा जिल्हा बँकेवर आणि दूध संघावर निवडून आले आहेत. त्यांच्या पत्नी जयश्री पाटील २०१३ मध्ये नगराध्यक्ष झाल्या आणि नंतर २०१७ ला जिल्हा परिषद झाल्या. त्यांनतर त्यांना २००९ व २०१४ ला भाजप कडून विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि दोन्ही वेळा त्यांना पराभूत व्हावे लागले होते. त्यांनतर माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या सोबत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. २०१९ ला राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली आणि अनिल पाटील विजयी झाले. अजित दादा समर्थक म्हणून पहिल्यांदा पहाटेच्या शपथविधीला ते अजित पवारांसोबत गेले. त्यानंतर खानदेशातील पक्षाचा एकमेव आमदार म्हणून पक्षाने त्यांच्यावर प्रतोद म्हणून जबाबदारी दिली. विरोधी पक्ष म्हणून प्रत्येक आंदोलनात त्यांनी मुख्य जबाबदारी पार पाडली. अनिल पाटील मंत्रिपदाची शपथ घेत होते तेव्हा त्यांच्या आई पुष्पाबाई शेतात काम करीत होत्या. मंत्रिपदाचे वृत्त पसरताच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून, पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.







