ठेकेदाराचे बोगस काम उघड, कामाच्या गुणवत्तेकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष…
अमळनेर:- शहरात सुरू असलेल्या भुयारी गटारीचे काम आधीच डोकेदुखी ठरले असताना आता जेमतेम बुजविण्यात आलेही खड्डेही पहिल्याच पावसात खचू लागल्याने हे खड्डे जीवघेणे ठरू लागले आहेत. संपूर्ण शहरात भुयारी गटारींच्या कामाबाबत ओरड सुरू असून अधिकारी यावर चुप्पी साधून आहेत.
न्यू प्लॉट परिसरात भगिनी मंडळ शाळा ते डी. आर. कन्या शाळा दरम्यान असलेल्या रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी भुयारी गटारीचे खोदकाम झाल्यानंतर खड्डे जेमतेम बुजविले गेले होते,त्यानंतर आता पावसाळा सुरू होताच बुजविलेला तो भाग मोठ्या प्रमाणात खचू लागला आहे.न्यू प्लॉट भागातील जयदीप राजपूत यांची नवी चारचाकी गाडी वाड्याच्या बाहेर पार्क केलेली असताना पहिला पाऊस रात्रभर झाल्याने रस्ता खचून गाडी एका बाजूने पूर्णपणे खड्ड्यात फसली गाडी मालकाने त्वरित बाहेर गावाहून क्रेन मागवून ती गाडी बाहेर काढली अन्यथा गाडीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. विविध शाळांकडे जाणारा हा रस्ता असल्याने येथून नेहमीच लहान बालके जात येत असतात एखाद्या वेळी एखाद्या मुलगा या खड्ड्यात पडून पूर्णपणे फसून जीवानिशी जाऊही शकतो एवढे खड्डे याठिकाणी पडले आहेत. नागरिकांच्या तक्रारींमुळे संबधीत विभागाने ओबडधोबड खडी टाकून खड्डे बुजविले असले तरी अजूनही हा रस्ता धोकादायक असून वाहनधारक तसेच लहान मुले व अबाल वृद्धांना येथून वापरणे कठीण कठीण झाले आहे.या रस्त्यावरील रहदारी लक्षात घेता तातडीने या रस्त्याचे नूतनीकरण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहरातील न्यू प्लॉट तसेच इतर भागात देखील याच पद्धतीने भुयारी गटारीचे खड्डे बुजविण्यात आले असल्याने शहरातील सर्व रस्तेच धोकेदायक ठरल्याचे चित्र आहे. या भुयारी गटारीचे खोदकाम हलगर्जीपणे बुजविणारी ती एजन्सी कुणाची? त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.
न्यू प्लॉट भागातील रस्त्याचे त्वरित नूतनीकरण करा…
न्यू प्लॉट भागातील भगिनी मंडळ शाळा ते दौरा कन्या शाळेपर्यंतचा रस्ता प्रचंड रहदारीचा असून अनेक शाळांना जोडणारा हा रस्ता असल्याने शाळकरी मुले मोठ्या प्रमाणात येथून वापरत असताना तसेच न्यू प्लॉट भागात दोन जैन मंदिर असल्याने येथील गुरू महाराज देखील नेहमीच येथील रस्त्यावरून अनवाणी चालत असतात यामुळे त्यांनाही रस्त्यावरील खडीचा मोठा त्रास होत असतो,याशिवाय विविध दवाखान्याचे रुग्ण व अबालवृद्ध देखील येथून वापरत असल्याने रस्त्याचे महत्व लक्षात घेता नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीनी या रस्त्याचे त्वरित नूतनीकरण आणि डांबरीकरण करावे अशी मागणी न्यू प्लॉट परिसर विकास मंचचे अध्यक्ष चेतन राजपूत व सदस्यांनी केली आहे.