अनेक पदाधिकाऱ्यांची आमदारांना सोबत तर काहींची वेट अँड वॉचची भूमिका…
अमळनेर:- राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट निर्माण झाल्यानंतर एक गट मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत गेला तर बाजार समिती निवडणुकीपासून नाराज असलेले तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसोबत काल आमदारांचा निषेध करत आम्ही शरद पवारांसोबत असल्याच्या घोषणा दिल्या.
मी शरदचंद्र पवारांसोबत असे लिहलेल्या टोप्या घालून काल सायंकाळी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, व कार्यकर्ते सचिन वाघ, हर्षल पाटील, संदेश पाटील यांच्यासह आठ नऊ कार्यकर्ते महाराणा प्रताप चौकात एकत्र येऊन घोषणाबाजी देऊ लागले. गद्दारांचा निषेध, अमळनेरच्या भूमिपुत्राचा निषेध, एकच साहेब शरद पवार साहेब अश्या घोषणा देण्यात आल्या.
राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर व आमदार अनिल पाटील यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर बहुतांशी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे जात आमदारांचे अभिनंदन केले. त्यानंतर संध्याकाळी खा. शरदचंद्र पवार यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर अनेकांची द्विधा मनस्थिती झाली आहे. तालुक्याला मंत्रिपद मिळाल्याचा आनंद असला तरी जुने निष्ठावंत खा. शरद पवारांच्या सोबतीला असू, असे अनेक कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.