मुरूम टाकण्याचीही नाही घेतली तसदी, नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा…
अमळनेर:- पावसाळ्यात भुयारी गटारीचे काम करण्याचे शहाणपण ठेकेदारास सुचल्याने रस्त्याचे अक्षरशः तीनतेरा झाले असून खोदकामामुळे सर्वत्र चिखल झाल्याने लोकांना चालणे देखील अवघड होतं आहे. आता न्यू भालेराव नगरातील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचा इशारा दिला आहे.
गटारी टाकण्यासाठी जे खड्डे केले ते जेमतेम बुजविले जात असल्याने त्याठिकाणी पावसाचे पाणी पडल्यानंतर प्रचंड चिखल माखत आहे.यामुळे मुलांना शाळेत जाता येताना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे, चिखलामुळे लोकांची ओरड झाल्यानंतर कॉलनीच्या सुरवातीला थोडाफार मुरूम टाकून बोळवण करण्यात आली परंतु जेथे मुरूम टाकला तेथे केवळ पाच सात टक्के लोकांचा रहिवास असून 95 टक्के लोक कॉलनीच्या आतमध्ये राहत असल्याने चिखलाच्या रस्त्यातून त्यांनी बाहेर पडावे तरी कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी वर्षापुर्वी भुयारी गटारीच्या एका लाईनेचे काम झाले आहे त्या फोडलेल्या चांगला डांबरी रस्त्यावर साधा मुरुम पण टाकला गेलेला नाही ,तसेच आताही गेले नऊ महिने पावसाची संपुर्ण मोकळीक असताना त्यावेळी संबधीत ठेकेदारास याठिकाणी कामाची आठवण आली नाही, मात्र पावसाळा सुरू होण्याच्या मौसमातच कामाचे शहाणपण का सुचले ? असा सवाल येथील लोक उपस्थित करीत आहेत. सदर राहिलेल्या ठिकाणी त्वरित मुरूम टाकून रस्ते चालण्यायोग्य न केल्यास आंदोलनाचा पवित्रा घेणार असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.