
अमळनेर:- तालुक्यातील जैतपीर येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या पाळधी येथील तरुणावर मुलीच्या जबाबावरून पॉक्सो व ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील जैतपिर येथील १७ वर्षीय मुलीला दिनांक २९ मे रोजी अज्ञात तरुणाने फुस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी मारवड पोलिसांनी दिली होती. तसेच एका तरुणावर संशय ही व्यक्त केला होता. मारवड पोलीस ठाण्याचे सपोनि शितलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ सचिन निकम व कॉन्स्टेबल उज्वल पाटील यांनी तपास केला असता सदर मुलगी व आरोपी हे पुण्यात असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना पुणे येथील लोहगाव साठे वस्ती येथून ताब्यात घेतले असून सदर आरोपी प्रकाश भिका कोळी रा. पाळधी ता धरणगाव हा जैतपिर येथील एकाचा शालक आहे. मुलीच्या जबाबानुसार आरोपीशी २ वर्षापासून तिचे प्रेमसंबंध होते. मुलीच्या आईवडिलांनी तिचे लग्न दुसरीकडे ठरवल्याने या दोघांनी पळून जात जळगाव येथे एक दिवस मुक्काम करून पुणे येथे आरोपीच्या काकुकडे राहावयास गेले व त्याठिकाणी लग्न ही केल्याचे सांगितले असून वेळोवेळी शारीरिक संबंध आले असल्याचे कथन केले. सदर मुलगी अल्पवयीन असल्याने आरोपीविरुद्ध कलम ३६६,३७६ सह पोक्सो, ॲट्रोसिटीच्या कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम करीत आहेत.







