
डोक्यावर हंडे घेत महिला व मुलींची गावाबाहेरून पायपीट…
अमळनेर:- तालुक्यातील रणाईचे आणि तांडा दोन्ही गावांना तांत्रिक अडचणींमुळे पाणी टंचाई जाणवत आहे. महिला व मुलींना गावाबाहेरून डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत आहे.
तालुक्यातील रणाईचे आणि तांडा या दोन ग्रामपंचायती पूर्वी एकत्र होत्या आता ग्रामपंचायती जरी स्वतंत्र झाल्या आहेत परंतु पाणी पुरवठा योजना सामायिक आहे. रणाईचे गावाला निसर्डी येथील धरणावरून पाणी पुरवठा होत असतो. निसर्डी येथे ग्रामपंचायतींची विहीर आहे. उन्हाळ्यात निसर्डी धरणातले पाणी कमी झाले आहे. त्यात तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे गावाला जेमतेम पाणी पुरवठा होत होता. दुष्काळात तेरावा महिना या उक्तीप्रमाणे जलजीवन मिशन अंतर्गत पाईप लाईन साठी जेसीबीने चारी खोदताना जुनी पाईप लाईन फुटली. फुटलेली पाईप लाईन जोडून देण्याची जबाबदारी ठेकेदाराची असताना त्यांनी जेमतेम जोडली आणि पुन्हा गळती सुरू झाली. परिणामी पाणी पुरेसे पोहचत नव्हते. पर्याय म्हणून तांड्यावरील बोअरवेल वापरली जात होती पण तिची मोटर देखील जळाली होती. ती दुरुस्त करून देखील सुरू झाली नाही म्हणून पुन्हा काढण्यात आली आहे. त्यामुळे गावाला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. निसर्डी धरणावरून पाणी गावाच्या विहिरीच्या शेजारी खड्डयात टाकून मोटार द्वारे ते विहिरीत जाते. पाणी नसल्याने गावातील महिला, लहान मुली गावाबाहेर असलेल्या आश्रम शाळा व माध्यमिक शाळेतील विहिरीवरून डोक्यावर हांडे ठेवून पाणी आणत आहेत. पाण्यासाठी महिलांचे श्रम आणि वेळ वाया जात आहे.







