
सा.बां. विभागाने लक्ष देत दुरूस्ती करण्याची प्रवाशांनी केली मागणी…

अमळनेर:- प्रताप महाविद्यालयाकडे जाणार्या मारवड रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूलावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन दुरूस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

रेल्वे लाईन व मारवडसह ३० खेड्यातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. यामुळे वाहतुकीची कोंडी दूर झाली असून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह मारवडकडे जाणार्या प्रवाशांची सोय झाली आहे. मात्र, सद्यस्थिती पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच पावसासाळा सुरू असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचून किरकोळ अपघात होत आहे. या पुलावरून रोज शेकडो वाहने ये- जा करत असतात. मात्र, खड्डे पडल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करत असतात. त्यातच अवजड वाहनेही या पुलावरून रोज ये- जा करत असल्याने पुलावर खड्डे पडले आहेत.

प्रताप महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थी- विद्यार्थिनींचीही रोज या पुलावरून वर्दळ असते. परिणामी विद्यार्थ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधी हे या पुलावरून प्रवास करत असतात. मात्र, त्यांच्या निदर्शनास ही बाब येत नाही का असा सवालही प्रवासी करीत आहेत.
रस्त्यावर गतिरोधक नसल्याने होताय अनेक अपघात…
शहरातून जाणारा गलवाडे रस्ता, मारवड रस्ता अत्यंत रहदारीचा रस्ता बनला आहे. मात्र, हाशमजी प्रेमजी व्यापारी संकूल, तसेच छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या दुतर्फा रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अनेक अपघात घडत असतात. त्यातच मध्ये पुलाचा वळण रस्ता असल्याने प्रवाशांना अडचणी येतात. भरधाव वाहने चालत असल्याने पादचार्यांनाही त्रास सहन करावा लागतो. अनेक अपघात घडले असून, याकडेही सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.







