
अमळनेर तालुक्यातील प्रवाशांचा समावेश, एका महिलेचा मृत्यू…
अमळनेर:- सप्तश्रृंगी गडावरून खामगावला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला असून प्रवाशांना घेऊन जाणारी बस सप्तश्रृंगी घाटातील दरीत कोसळली. या बसमध्ये तालुक्यातील १४ प्रवासी होते त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला असून इतर प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
बुधवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव आगाराची बस सप्तश्रृंगी गडावरून खामगावला जाण्यासाठी निघाली होती. या बसमधून २२ प्रवासी प्रवास करीत होते. वणी गड उतरत असताना गणपती पॉईंटजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर बस थेट दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तालुक्यातील मूडी प्र. डांगरी येथील प्रवासी…
या बसमध्ये मूडी प्र. डांगरी येथील १४ प्रवासी असल्याची माहिती असून त्यातील आशाबाई राजेंद्र पाटील यांचा मृत्यू झाला असून मूडी येथील प्रमिलाबाई गुलाबराव बडगुजर, संजय बळीराम भोई, सुशिलाबाई सोनू बडगुजर, वच्छलाबाई साहेबराव पाटील, सुशीलाबाई बबन नाजन, विमलबाई भोई, प्रतिभा संजय भोई, जिजाबाई साहेबराव पाटील, संगीता मंगुलाल भोई, रत्नाबाई, सुरेखाबाई हिरालाल बडगुजर, संगीता बाबूलाल भोई, भारगोबाई माधवराव पाटील हे जखमी झाले आहेत. जखमींत अकोला, भोकर, निफाड, शिरपूर, साक्री व गडावरील प्रवाशांचा समावेश आहे.









