सरकारी भावापेक्षा कमी भावाने होतेय कापूस खरेदी, किसान काँग्रेसचे निवेदन…
आगामी अधिवेशनात हा प्रश्न उचलून धरण्याबाबत नाना पटोले यांना केली विनंती…
अमळनेर:- नियमित कर्जफेड करणारे ४० टक्के शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत आणि सरकारी भावापेक्षा व्यापारी कमी भावाने कापूस खरेदी करून शेतकऱ्यांना लुटत असल्याने आगामी पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा हा प्रश्न उचलून धरावा अशी मागणी अमळनेर किसान काँग्रेसतर्फे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश पाटील व अमळनेर तालुकाध्यक्ष प्रा सुभाष पाटील यांनी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली. नियमित कर्ज फेडणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळत नाही. अजून ४० टक्के शेतकरी वंचित आहेत. वेळोवेळी आंदोलने केली. जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक याना तक्रारी करूनही अद्याप अनुदान मिळाले नाही. शेतकऱ्यांनी वेळोवेळी कर्ज फेडले त्यांना थकबाकीदार शेतकरीचा लाभही मिळालेला नाही म्हणून हा प्रश्न पावसाळी अधिवेशनात उचलून धरावा असेही निवेदनात म्हटले आहे. त्याच प्रमाणे गत हंगामातील कापूस अजून पडलेला आहे. केंद्र आणि राज्याच्या चुकीच्या धोरणामुळे कापूस खरेदी सुरू झाली नाही. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. व्यापारी रोज भाव पाडून कापूस मागत आहेत. सरकारी भाव ८ हजार २०० असताना खाजगी व्यापारी ७ हजार रुपये क्विंटल दराने कापूस खरेदी करत आहेत. १२०० रुपये पेक्षा जास्त दराने लूट सुरू आहे याही प्रश्नाला पावसाळी अधिवेशनात वाचा फोडावी असे निवेदनात म्हटले आहे.