
अमळनेर:- तालुक्यातील खेडी प्र.ज. येथे स्व. नानासो साहेबराव देवचंद पवार सार्वजनिक वाचनालयातर्फे बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
वाचनालयातर्फे वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण सोहळा पार पडला. रांगोळी स्पर्धेत महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. विजेत्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय व काही स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरवण्यात आले. तसेच सन 2022 -23 शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी, अकरावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. हा कार्यक्रम प्रा. श्याम पवार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन स्व. नानासो साहेबराव देवचंद पवार सार्वजनिक वाचनालय खेडी प्र.ज. व राजमुद्रा अभ्यासिका खेडी प्र.ज. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष खेडी गावचे सुपुत्र शरद माधवराव पाटील (युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, जळगाव) हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर रावण बाविस्कर (सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा नियोजन समिती) व मनोज दाजीबा पाटील, सरपंच आशाताई ज्ञानदेव पाटील ( ग्रुप ग्रामपंचायत खेडी प्र.ज.) शोभाबाई भास्कर पाटील (उपसरपंच, खेडी प्र.ज.) सर्व ग्रा.प. सदस्य व संचालक वि.का.स. सोसायटी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.शाम पवार यांनी वाचनालयातर्फे पुढील वर्षी सुद्धा नवनवीन उपक्रम राबविण्यात येतील हे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला गावातील तानाजी पाटील, एम एस पाटील, प्रा. डी डी पाटील व विलास शिंदे यांनी मनोगत व्यक्त केली. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एस आर बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना मेहनतीचे मोल सांगितले तर दुसरे मान्यवर मनोज पाटील यांनी विद्यार्थ्याना विविध क्षेत्रात पुढे कसं जायचे मार्गदर्शन केले तर आपल्या अध्यक्षीय भाषणात शरद पाटील यांनी आपल्या गावातील विद्यार्थ्यांनी एमपीएससी व यूपीएससी आपल्या गावाचे नाव उज्वल करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कैलास पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. जिजाबराव पाटील यांनी केले या कार्यक्रमाला राजमुद्रा अभ्यासिकेतील सदस्य समाधान पाटील नरेंद्र पाटील, हर्षवर्धन पवार, राज पाटील, विशाल वारुळे, मयूर पाटील, किरण पाटील, भावेश पाटील, चंद्रकांत पाटील, वाल्मीक पाटील रोहन शिंदे व इतर सर्व सदस्यांनी सहकार्य केले.







