यमुनाई प्रतिष्ठानचा प्रेरणादायी उपक्रम, विजेत्यांना पारितोषिक वितरण…
अमळनेर:- “निबंध लेखनातून विद्यार्थ्यांना विविध रुपातील आई कळली व ती कागदावर मांडता आली. सुंदर हस्ताक्षरातून लिहणाऱ्याचे व्यक्तिमत्व समजते”, असे मत युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील खौशी बु. विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या माजी संचालिका कै.यमुनाबाई उत्तम सूर्यवंशी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त यमुनाई प्रतिष्ठान, अमळनेेर तर्फे तालुकास्तरीय ‘निबंध लेखनातून सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण गुरुवार, दिनांक १३ जुलै रोजी येथील धनदाई महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार होते. विचार मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून धनदाई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी. पाटील, ग्रुप ग्रामपंचायत खौशी बु. च्या सरपंच जयश्री देशमुख, अरुण देशमुख, प्रा. डॉ. लिलाधर पाटील, स्पर्धा परिक्षक सोपान भवरे, यमुनाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय सूर्यवंशी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते आईसाहेब जिजाऊ व कै. यमुनाबाई सूर्यवंशी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिजाऊ वंदना म्हटली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा बुके व पुस्तक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यमुनाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेबाबत भूमिका मांडली. यावेळी आईचे श्रम व शिक्षणावेळी समाज व शिक्षकांकडून मिळालेल्या मदतीमुळे मी घडलो असे सांगत स्वर्गीय आईच्या गत आठवणींना उजाळा देताना अश्रू अनावर झाले होते. परीक्षक सोपान भवरे यांनी स्पर्धकांना अधिक चांगले लेखन कसे करता येईल याबाबत माहिती दिली. माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा दोन गटासाठी तालुकास्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती. यात ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘आई’ विषयावर माध्यमिक गटातून जय रंगराव पाटील चा निबंध सर्वोत्तम ठरला. तर महाविद्यालयीन गटातून ‘अनिष्ट प्रथा व समाज’ या विषयावर एन. एम. कोठारी कनिष्ठ महाविद्यालय, कळमसरेची विद्यार्थिनी आफरिन महेमुद खान पठाण सर्वोत्तम ठरली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना आकर्षक स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांनाही सहभागाचे प्रमाणपत्र व पुस्तक देण्यात आले. यावेळी नीट परिक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या की.भूमी रंगराव पाटील, सूरज रविंद्र मोरे, ज्ञानेन्द्र विजय बडगुजर यांनाही स्मृतिचिन्ह व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
‘निबंध लेखनातून सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’ विजेत्यांमध्ये माध्यमिक गटातून प्रथम जय रंगराव पाटील, द्वितीय मुस्कान मुश्ताक खाटीक, तृतीय पूनम भटू पाटील, उत्तेजनार्थ १. गणेश भागासिंग तडवी २. स्वरा ललित भोसले, ३. रितेश श्रीराम बच्छाव, ४. तेजस कैलास रोकडे, ५. स्पर्श जितेंद्र सोनवणे,६. मोहीत किशोर वाघ, ७. श्वेता गौतम बैसाणे हे यशाचे मानकरी ठरले. तसेच महाविद्यालयीन गटातून प्रथम आफ्रिन महेमुद खान पठाण, उत्तेजनार्थ रमा संजय चव्हाण यशाच्या मानकरी ठरल्या. यापुढील संगणकीय युगात लेखन दुर्लक्षित होत असताना धनदाई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी. पाटील म्हणाले की, निबंध व हस्ताक्षर दोन्ही विषय एकत्र करुन होणारी स्पर्धा एक वेगळेपण असून स्पर्धेत हार जीत ही होत असते. हे सांगताना ‘कभी हार.. कभी जीत’ गाण्याच्या ओळी गायिल्या. अरुणबापू देशमुख यांनीही काही आठवणी सांगून प्रवास उलगडला. यमुनाई प्रतिष्ठानच्या प्रेरणादायी उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयाराम पाटील सर यांनी तर आभा रप्रदर्शन उमेश काटे यांनी केले. यावेळी उपस्थित पत्रकार बांधव यांचे आयोजकांनी स्वागत केले. यावेळी पत्रकार उमेश काटे, ईश्वर महाजन, रविंद्र मोरे, अजय भामरे, भाऊसाहेब देशमुख, रंगराव पाटील, विजय बडगुजर, कैलास रोकडे, मराठा सेवा संघ व युवा कल्याण प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक, विद्यार्थी विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.