
खाते जाहीर होताच निवासस्थानी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून केला जल्लोष…
अमळनेर:- नामदार अनिल भाईदास पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांना कोणते खाते मिळणार याबाबत अमळनेर मतदारसंघात उत्सुकता असताना काल मुंबई येथे अनिल पाटील यांना मदत व पुनर्वसन मंत्रालयाचे खाते जाहीर झाल्याने अमळनेर येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करणे, वादळ, अतिवृष्टी, विविध आपत्ती आणि नुकसान झालेल्या नागरिकांचे/क्षेत्राचे पूनर्वसन करणे हे मंत्री अनिल पाटील यांच्या अखत्यारीत असेल. दरवर्षी बोरी नदीला पूर आल्याने सात्री गावावर संकट येते सर्व व्यवहार ठप्प होतात. आरोग्य यंत्रणा, बोटीची मदत, पशु खाद्य आदी साठी मदतीची अपेक्षा असते. त्यामुळे पुनर्वसन होईपर्यंत दरवर्षीच्या आपत्तीत सापडणाऱ्या सात्री गावाला मंत्री अनिल पाटील यांच्या मदतीचा हात मिळू शकतो.
मंत्री पद विस्तारानंतर खातेवाटप संदर्भात विलंब होत असल्याने नव्या मंत्र्यांना विना खात्याचे मंत्री म्हणून काम पहावे लागत होते,नव्या मंत्र्यांना कोणकोणते खाते मिळणार याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात होते, यात अनिल पाटील यांच्या बाबतीत देखील वेगवेगळ्या खात्यांची चर्चा होत होती,अखेर पक्षाच्या बैठकीत खाते वाटपाचा तिढा सुटून काल दुपारी मुंबई येथे राजभवनात खाते वाटप जाहीर होऊन यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ व नियोजन तर अनिल पाटील यांना मदत व पुनर्वसन आणि इतर मंत्र्यांची देखील खाती जाहीर झाली.सदर वृत्त माध्यमांवर येताच अमळनेरात येथे अनिल पाटील कार्यालयाजवळ जल्लोष साजरा झाला.यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्यासह प्रा सुरेश पाटील, मुख्तार खाटीक, गणेश भामरे, अनिल शिसोदे, रामलाल पाटील, इम्रान खाटीक, गौरव पाटील, विश्वास पाटील, सुनील शिंपी, निलेश देशमुख, प्रदीप पाटील, राहुल गोत्राळ, अमोल पाटील व कार्यकर्ते, मित्रपरिवार यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
नामदार अनिल पाटील होते अमळनेरातच..
खातेवाटप प्रसंगी नामदार अनिल पाटील हे अमळनेरातच असल्याने अनेकांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले.सदर घोषणेनंतर मुंबईत जाऊन आपल्या खात्याचा पदभार ते स्वीकारणार असल्याचे कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.अनिल पाटील यांना मंत्रालयाच्या नव्या बिल्डिंगमध्ये दालन मिळाले असून स्वतंत्र बंगला देखील मिळाला आहे.खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री म्हणून त्यांचा कारभार सुरू होणार आहे.







