जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिली माहिती, अधिकाऱ्यांना केल्या विविध सूचना…
निवेदन देत जिल्हाधिकाऱ्यांसमोर नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा…
अमळनेर:- शासकीय दंड न भरलेल्या सात जणांच्या जमीनी सरकारने जमा केल्या असून जवखेडा येथील गायत्री फर्टिलायझर व कृषी विश्व ऍग्रो एजन्सी ही दोन दुकाने दोषी आढळून आल्याने या दुकानांचे परवाने रद्द बाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत तर महावीर कृषी केंद्र अमळनेर, स्वामी कृषी केंद्र पातोंडा, दिपक ऍग्रो अमळनेर या दुकानांवर कारवाईचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, असेही जिल्हाधिकारी यांनी अमळनेर येथे आढावा बैठक प्रसंगी सांगितले.
प्रशासनाने निवडणुकांची पूर्वतयारी सुरू केली आहे.p जिल्ह्यात मतदान यंत्रे प्राप्त झाली असून अभियंत्यांमार्फत त्यांची प्राथमिक तपासणी सुरू आहे. नवीन मतदार नोंदणी वाढवा आणि राजकीय पक्षांचे बूथ लेव्हल एजंट नेमा आणि मयत मतदार, पत्ता बदल ,नाव चुकलेले, दोन ठिकाणी नावे याबाबत यादी अपडेट करा तक्रारी यायला नको अशा सूचना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी महसूल अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिल्या.
अमळनेर येथील ग स हायस्कूल मध्ये तालुक्यातील सर्व शासकीय विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस ४८ विभागाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, डी वाय एस पी सुनील नंदवाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस एस वारुळे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, वनअधिकारी एस बी देसले, तालुका कृषी अधिकारी सी जे ठाकरे, मारवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांच्यासह महिला बालकल्याण अधिकारी, भूमी अभिलेख निरीक्षक, दुय्यम निबंधक विविध विभागाचे अधिकारी हजर होते.
विविध दाखल्यांसाठी महाराजस्व अभियान पुन्हा सुरू करा, सोलर यंत्रणा बसवणे वाढवा जेणेकरून शेतकऱ्यांना आठ ऐवजी बारा तास वीज मिळेल, जलयुक्त शिवाराची कामे व त्याबाबत अहवाल ३० जुलै पर्यंत द्या, अमृत सरोवर मध्ये झाडे लावा, सात्री रस्त्याबाबत देखील ताबडतोब अहवाल मागवा, व्हिलेज मॅप करा, शिल्लक मोजणी प्रस्ताव तात्काळ निकाली काढा आदी सूचना विविध विभागांना जिल्हाधिकारी यांनी केल्या.
यावेळी अमृत सरोवरची तालुक्यात चार कामे पूर्ण झाली आहेत. बीएसएनएल टॉवर साठी १३ प्रस्ताव आले असून ३ झाले आहेत, रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी निधी मिळत नाही, तालुका कोतवाल भरती १८ पासून सुरू होत आहे यासह इतर माहिती जिल्हाधिकारीना विविध विभागातर्फे देण्यात आली.
नागरिकांनी निवेदन देत वाचला तक्रारींचा पाढा…
सेतू केंद्र चालक दहापट जास्त प्रमाणात ग्राहक व विद्यार्थ्यांकडून फी आकारत असल्याची तक्रार अविनाश पवार यांनी केली. सात्री गावाच्या आपत्कालीन परिस्थितीबाबत बैठक घ्या आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा अशी मागणी महेंद्र बोरसे यांनी केली. महार वतन जमिनीत वन अधिकाऱ्यांनी फॉरेस्ट म्हणून नाव लावून घेतले आहे ती जमीन सपाटीकरण करून मिळावी अशी मागणी कैलास बिऱ्हाडे व इतर सभासदांनी केली, धान्य घोटाळ्यातील आरोपी तहसीलदार व गोडाऊन किपर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जितेंद्र ठाकूर यांनी केली, पातोंडा आरोग्य केंद्रात कर्मचारी कमी आहेत औषधी मिळत नाहीत,अवैध वाळू वाहतूक जोरात सुरू आहे अशी तक्रार करण्यात आली. चोपडा रोड व गलवाडे रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या प्रवेशद्वारावर खर्च करण्यापेक्षा मूलभूत सुविधांवर खर्च करावा अशी तक्रार संदीप पाटील यांनी केली तर शीतल देशमुख यांनी ब सत्ता प्रकरणातील प्रकरणे क सत्ता प्रकारात करण्यात यावेत अशी मागणी केली.