जुने बसस्टँड भागातील घटना, दोन लाखांचे झाले नुकसान…
अमळनेर:- शॉर्ट सर्किटने दोन दुकाने आगीत जळून खाक झाल्याची घटना १६ रोजी रात्री साडे अकरा वाजता जुने बसस्थानक परिसरात घडली. आगीत दोन लाखाचे नुकसान झाले आहे.
राजेंद्र भावराव जगताप रा झामी चौक यांचे फायनल प्लॉट १२३ मध्ये दुकान असून दि. १६ रोजी रात्री त्यांच्या दुकानातून धूर निघत असल्याचे शेजारच्या दुकानदाराने कळवले. जगताप येईपर्यंत दोन दुकानांनी पेट घेतला होता. शॉर्ट सर्किट मुळे आग लागली होती. वायर स्पर्किंग होत असल्याने वीज कर्मचाऱ्यांना विद्युत प्रवाह बंद करण्यासाठी बोलावण्यात आले. मात्र आम्ही रात्री येत नाही, आमच्या साहेबाना सांगा म्हणत अर्धा तास कोणीच आले नाही. तोपर्यंत मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या आदेशाने अग्निशमन दलाची वाहने येऊन ठेपली होती. मात्र वायर स्पर्किंग होत असल्याने पाणी मारणे देखील धोकेदायक होते. बऱ्याच वेळेनन्तर आपोआप वायर जळून विद्युत प्रवाह कट झाला. उशिराने वायरमन आले आणि डीपी बंद केली. त्यांनंतर नितीन खैरनार, फारुख शेख, जफर खान, दिनेश बिऱ्हाडे, आंनदा झिम्बल यांनी आग विझवली.
राजेंद्र जगताप यांच्या श्रीराज वेल्डिंग दुकानातील वेल्डिंग मशीन, कटर, ड्रिल मशीन जळून तर शेजारील रोहिदास हिम्मत शिंगाणे यांच्या कल्पेश सर्व्हिस सेंटर मधील १७ एलईडी, १० टीव्ही, ४ विद्युत शेगड्या, १५ होम थिएटर व फर्निचर असे सुमारे दोन्ही दुकाने मिळून दोन लाखाचे नुकसान झाले आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.