
जागेवर पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याबाबत निवेदन…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड भागातील शिवारात कपाशी पिकावर लाल्या रोग पडल्याने पीकविमा, शासकीय मदत व नुकसानभरपाई तसेच जागेवर पंचनामा करण्यात यावा या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांतर्फे तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले.
तालुक्यातील मारवड येथील ज्ञानेश्वर पवार यांची गोवर्धन शिवारात शेती आहे. त्यांनी त्यांच्या शेतात कापूस पिकाची लागवड केलेली असून,पिकाची योग्य निगा घेऊन देखील ठेवली आहे,मात्र बदलत्या हवामानामुळे कापसाचे पीक लाल पडू लागले असून त्याची वाढ खुंटली आहे.या नैसर्गिक आपत्तीने शेतातील ७५% पिकाचे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.तरी शासकीय यंत्रणेने प्रत्यक्ष शेतात येऊन पिकाची पाहणी करावी तसेच आपणास शासकीय मदत व पीकविमा नुकसानभरपाई मिळावी अशी विनंती शेतकऱ्यांतर्फे निवेदनात करण्यात आली आहे.







