सीसीटीव्हीतून तीन महिन्यांनी उघडकीस आला प्रकार…
अमळनेर:- शहरातील एका हॉटेल मालकानेच वेटरच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने मारहाण करून त्याचा खून केल्याचा प्रकार तब्बल तीन महिन्यांनी उघडकीस आला आहे. सीसीटीव्हीतून हा प्रकार उघडकीस आल्याने पोलिसांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी नरेंद्र उर्फ भटु यशवंत चौधरी (माळी वाडा) याची सुजाण मंगल कार्यालयाजवळ हॉटेल असून दगडू उर्फ बाबूभाई नारायण पाटील हा तेथे वेटर म्हणून काम करीत होता. दगडू पाटील गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या सुरत येथे राहणाऱ्या कुटुंबापासून वेगळा राहून अमळनेर येथे हॉटेलवर काम करीत होता. हॉटेल मालक नरेंद्र चौधरी याने २२ एप्रिल रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिली की, सकाळी सहा वाजता हॉटेल कडे चक्कर मारला असता दगडू पाटील खाली दगडावर पडलेला होता. त्याच्या डोक्याला जखम होती व छातीला खरचटले होते. तेथून नरेंद्र याने त्यास खाजगी रुग्णवाहिकेने धुळे येथे उपचारासाठी दाखल केले होते. तेथून त्याला सुरत येथे नातेवाईकांच्या ताब्यात देऊन उपचारासाठी दवाखाण्यात दाखल केले होते. ६ मे रोजी त्याचा सुरत येथे मृत्यू झाला होता. चौधरी याने अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र सुरत येथील अहवाल , दगडू पाटील यांच्या अंगावरील जखमा आणि साक्षीदार यांच्या म्हणण्यानुसार तफावत आढळून आल्याने पोलिसांना संशय आला होता. पोलिसांनी घटनास्थळजवळील फुटेज तपासले असता २२ रोजी पहाटे मालक नरेंद्र चौधरी हा वेटर दगडू पाटील याला मारहाण करीत होता. दगडू खाली पडल्यावर त्याच्या छातीवर व डोक्यावर लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत होता. तसेच जवळील पडलेली लोखंडी वस्तू उचलून दगडूच्या डोक्यावर तीन वार केले. डोक्यात दगडही मारला. आणि त्याला जखमी अवस्थेत सोडून गेला. दगडूचा मृत्यू नरेंद्र याच्या मारहाणीनेच झाला असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस घनश्याम अशोक पवार याच्या फिर्यादीवरून नरेंद्र चौधरी (वय ३५) याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.