अमळनेर:- तालुक्यातील मारवड कळमसरे रस्त्यावरील शेतात शेतीच्या वादातूनच हाणामारी झाली असून एकाने चौघांच्या विरुद्ध मारवड पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी रवींद्र सुकदेव बडगुजर हे दिनांक २१ रोजी शेतात आले असता शेजारच्या शेतात कोळपणी सुरू होती. व शेजारील शेतकरी सामाईक बांधावरून त्यांच्या हिश्श्यातून औत व बैलजोडी न वळविता फिर्यादीच्या शेतातून वळवित असल्याने त्याच्या मकाच्या पिकाचे नुकसान होत होते. त्यामुळे फिर्यादीने त्यांना समज दिली. त्यानंतर फिर्यादी घरी जाण्यास निघाले असता पाठीमागून प्रशांत ज्ञानेश्वर बडगुजर, योगेश ज्ञानेश्वर बडगुजर, ज्ञानेश्वर एकनाथ बडगुजर, आत्माराम एकनाथ बडगुजर हे आले व तू काय दादागिरी दाखवतो असे सांगत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादीची मुले त्याठिकाणी आली असता त्यांना देखील मारहाण करत तुम्ही शेतात कसे येतात ते पाहतो अशी धमकी दिली. फिर्यादीने दवाखान्यात उपचार घेवून काल मारवड पोलिसांत फिर्याद दिल्याने भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोना सुनील तेली हे करीत आहेत.