अमळनेर:- तालुक्यातील मारवड व पंचक्रोशीतील ग्रामस्थांतर्फे मारवडचे सुपुत्र व आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांचा जलप्रहरी पुरस्कार मिळाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला.
मारवड व परिसर विकास मंचाच्या माध्यमातून विविध माध्यमांतून जलसिंचन योजना राबविण्यात आल्या असून परिसरात नाला व नदी खोलीकरण, बंधारे व रिचार्ज शाफ्ट आदी कामे करण्यात आली. त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर भूजलपातळी उंचावली असून अनेकांच्या विहिरींना व बोअरवेलला पाणी आले होते. या जलसंधारणाच्या कामात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल आयकर आयुक्त संदिपकुमार साळुंखे यांना तसेच इं. विजय भदाने व राकेश गुरव यांना दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याहस्ते गौरविण्यात आले होते. त्यामुळे मारवड ग्रामस्थांतर्फे दिनांक २१ रोजी नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याआधी आयकर आयुक्त संदिपकुमार साळुंखे व सहकाऱ्यांनी गावातील विहिरींना भेट देत पाण्याची पातळी पाहिली. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी विकासमंचच्या कामामुळे भूजलपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे सांगत आभार मानले. मारवड ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या निलिमाताई मिश्रा, माजी जि.प. सदस्य शांताराम साळुंखे, सरपंच आशाबाई भील, उपसरपंच भिकन पाटील, सर्व सदस्य व परिसरातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरस्वतीची मूर्ती देत संदिपकुमार साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना साळुंखे यांनी सांगितले की, २०१३ पासून ह्या कामाला सुरुवात केली तर आता त्याची थोडीफार फळे आपणास चाखण्यास मिळत आहेत. ही काम असेच सुरू राहील असे सांगत त्यांनी गावाच्या समस्यांना हात घालत ग्रामस्थांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. त्या समस्या ग्रामपंचायत व संबंधित विभागाने तात्काळ सोडवाव्या असे सांगत कोणत्याही कामात मदत लागल्यास मारवड विकास मंच हाजिर राहील असे सांगितले. यावेळी सार्व. बांधकाम विभागाचे अभियंता विजय भदाने यांचा ही सत्कार करण्यात आला. जोपर्यंत मारवड व परिसरात पाणीपातळी उंचावत नाही तोपर्यंत केळी खाणार नाही अशी शपथ २०१३ मध्ये मंचाच्या सदस्यांनी घेतली होती. मात्र आता पाणीपातळी उंचावल्याने शपथेवर गावासमक्ष पाणी सोडण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल जे चौधरी यांनी केले तर आभार इं. विजय भदाने यांनी मानले.