छताच्या पंख्याला गळफास घेवून संपवली जीवनयात्रा…
अमळनेर:- शहरातील गलवाडे रस्त्यावर असलेल्या श्रद्धा नगर जवळील समर्थ नगरात एका 20 वर्षीय तरुण मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दि. २९ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.
रोहित धनंजय जोशी (वय २० वर्ष) असे मयत तरुणाचे नाव असून त्याचे वडील धनंजय उर्फ राजू जोशी हे प्लंबर आहेत. काल दुपारी ३:३० वाजता राजू जोशी व त्यांच्या पत्नी मंदिरात जात असल्याने त्यांनी मुलास सोबत येण्यास सांगितले असता त्याने नकार देऊन घरीच थांबतो असे त्याने सांगितले. यामुळे ते दोघेच मंदिरात निघाले तर लहान मुलगा ट्युशनला गेला असल्याने रोहित एकटाच घरी होता, यादरम्यान त्यांनी घरात छताच्या पंख्याला गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. रोहितचा लहान भाऊ ट्युशनहुन आल्यानंतर त्याला भाऊ लटकलेला दिसल्याने त्याने हंबरडा फोडत आईवडिलांना बोलविले. रोहितचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अमळनेर ग्रामिण रुग्णालयात नेण्यात आला. याबाबत अमळनेर पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
रोहितचे शिक्षण 12 वी पर्यंत होऊन त्यानंतर तो आयटीआय करीत होता. त्याने आत्महत्येचा निर्णय का घेतला याची माहिती मिळू शकली नाही मात्र या घटनेने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.त्याच्या पश्चात आई वडील, एक लहान भाऊ व एक विवाहित बहीण असा परिवार आहे.