शहरातील केशव नगर भागातील महिलेची पालिकेकडे तक्रार…
अमळनेर:- घराशेजारील कोंबडीचा पोल्ट्री फार्म बंद करण्यात यावा अशी मागणी केशव नगर मधील शीतल नंदलाल माळी यांनी पालिकेकडे केला असून महिलेला दमबाजी करणाऱ्या पोल्ट्री फार्म मालकाचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणीही नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीना केली आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझे पती देशसेवेत आहेत मी मुलाबाळांसह केशवनगर मध्ये एकटी राहते. माझ्या घराशेजारी भिंतीला लागून कोंबडीचा पोल्ट्री फार्म असल्याने मुलांना अंगावर पुरळ येणे ,खाज सुटणे, दुर्गंधी यासह अनेक प्रकारचा त्रास होत आहे. पोल्ट्री फार्म मालकाला याबाबत तक्रार केली असता माझा मुलगा पोलीस आहे, तुम्हाला कुठे तक्रार करायची असेल ते करा अशी धमकी देत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. निवेदनाच्या प्रति तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक, जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.