
विप्रो कन्सुमर केअर आणि आधार संस्था यांच्यामार्फत उपक्रम…
अमळनेर:- विप्रो कन्सुमर केअर आणि आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे मागील वर्षी तालुक्यातील ग्रामीण भागात शाळेत शालेय विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करून त्यांना चष्मे दिले गेले ज्याचा अनेक गरजू ग्रामीण मुलांना फायदा झाला. या शैक्षणिक वर्षापासून अंमळनेर शहरातील शाळांमध्ये डोळे तपासणी शिबिराची सुरुवात झाली असून त्याचा उद्घाटन सोहळा गंगाराम सखाराम हायस्कूल येथे नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल शिंदे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून विप्रो अमळनेरचे जनरल मॅनेजर विजय बागजीवाला, नगरपालिकेचे प्रशांत सरोदे, मॅनेजर चेतन थोरात, अकाउंट मॅनेजर अनंत निकम , प्रोडक्शन मॅनेजर व्यंकटेश गुरम, वेल्फेअर ऑफिसर सुधीर बडगुजर,आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील, श्रीमती रेणू प्रसाद , शिक्षण विस्तारधिकारी श्रीमती ए बी सुर्वे, जीएस हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री बी एस पाटील, पर्यवेक्षक एस बी निकम, ए डी भदाणे, नगरपालिकेचे संजय चौधरी नेत्रचिकित्सक अभिनय मुंदडा इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शहरी शाळांमधील आरोग्य तपासणी दरम्यान दहा हजार मुलांचे डोळे तपासले जाणार असून त्यातील ज्यांना चष्म्याची आवश्यकता आहे अशा सर्व मुलांना चष्म्यांचे देखील वाटप करण्यात येईल, ज्या विद्यार्थ्यांना डोळ्याच्या गंभीर समस्या असतात त्यांना डॉक्टर राहुल मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचार केले जातील. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे सरांनी उपक्रमाचे कौतुक करून हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल शिंदे यांनी विप्रोचे अमळनेरचे असलेले नाते व्यक्त केले तसेच भविष्यात देखील विप्रो कंपनी अमळनेरसाठी अजून भरीव कार्य करेल. आमचे अमळनेर करांचे म्हणणे तुम्ही असेच प्रेमजी साहेबांपर्यंत पोहोचवा अशी विप्रो अधिकाऱ्यांना विनंती केली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर भारती पाटील यांनी केले व सदर उपक्रमाची सविस्तर माहिती सांगितली. चेतन थोरात यांनी आपल्या मनोगतात विप्रो आधार संस्था तसेच इतर संस्थांसोबत करत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भदाने यांनी केले तर आभार प्रदर्शन एम ए पाटील यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधार संस्थेचे कल्पना पाटील, दीप्ती शिरसाठ, तोसिफ शेख, दीपक विश्वेश्वर मुरलीधर बिरारी, राकेश महाजन तसेच जी एस हायस्कूल मधील शिक्षक वृंद यांनी प्रयत्न केले.







