सेवानिवृत्त केंद्रप्रमुखाने मोफत अध्यापन करणार असल्याचे दिले पत्र…
अमळनेर:- तालुक्यातील जिल्हापरिषद शाळांमध्ये मानधनावर अध्यापन करण्यासाठी १५ सेवानिवृत्त शिक्षकांची निवड निश्चित झाली आहे. अद्यापही १२ पदवीधर निवृत्त शिक्षक मिळालेले नाहीत. मात्र एका सेवानिवृत्त केंद्रप्रमुखाने मोफत अध्यापन करायला तयार आहे, असे लेखी पत्र गटशिक्षणाधिकारी याना दिले आहे.
जिल्हापरिषदांच्या प्राथमिक शाळेत शिक्षक भरती होत नसल्याने मुलांच्या अध्ययनावर परिणाम होत होता म्हणून भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शासनाने सेवानिवृत्त शिक्षकांना दरमहा २० हजार रुपये मानधनावर अध्यापन करण्यासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात अमळनेर तालुक्यात २१ निवृत्त शिक्षकांचे अर्ज प्राप्त झाले होते. नुकतेच निवृत्त झालेल्याना प्राधान्य म्हणून ११ शिक्षक व ४ पदवीधर अशा १५ जणांची निवड निश्चित करून जिल्हापरिषदेकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र निवृत्त केंद्रप्रमुख बन्सीलाल भागवत यांनी मला अध्यापनाची आवड असल्याने मी मोफत अध्यापन करण्यास तयार आहे असे लेखी पत्रच दिले आहे. एकीकडे निवृत्त झाल्यावर पेन्शन मिळत असतांनाही २० हजार रुपये मानधन घेण्यास काही शिक्षक तयार असतांना भागवत यांनी मोफत अध्यापनाची तयारी दर्शवल्याने त्यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. तालुक्यात १६ पदवीधर शिक्षकांची आवश्यकता होती. मात्र चारच अर्ज आल्याने त्यांना घेण्यात आले. तर सहा डीएड शिक्षक माघारी पाठवण्यात आले. काही निवृत्त शिक्षकांनी जवळच गाव पाहिजे, तालुक्याच्या शेवटच्या हद्दीवर नको, बाहेर तालुक्यात नको असा आग्रह धरला होता. तर अनेक निवृत्त शिक्षकांनी आपल्याकडून पूर्ण क्षमतेचे कार्य होत नाही म्हणून आपण सेवानिवृत्त होतो. त्यासाठी हे काम सुशिक्षित बेरोजगारांना दिले पाहिजे. त्यांची ऊर्जा आणि उत्साह निश्चित जास्त असेल असे म्हणून नकार देखील दिला आहे.
पात्र डीएड बीएड धारकांमध्ये कमालीची नाराजी…
एकीकडे शासन हजार हजार रुपये चलन घेवून अभियोग्यता व टीईटी परीक्षा घेते, त्यातील पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया न राबविता निवृत्त झालेल्या शिक्षकांनाच मानधन तत्वावर नियुक्त्या देत असल्याने पात्र तरुण डीएड बीएड धारकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.