दुकानाचे नुकसान करत मालकाचे पैसे नेले काढून…
अमळनेर:- दारू दिली नाही म्हणून दोघांनी जनता बियर बार वर धिंगाणा करत दुकानाचे नुकसान करून मालकाचे पैसे काढून नेल्याची घटना १० रोजी सायंकाळी ६ वाजता घडली.
शहरातील बाजारपेठेत असलेल्या जनता बियर बार वर सुलतान रहिमखा पठाण (रा शाहआलम नगर) याने दारूची बाटली मागितली. त्यावर मालकाने तू येथे दारू पिऊ नको, पिल्यावर तू पैसे देत नाही आणि काचेचे ग्लास फोडून नुकसान करतो. असे बोलण्याचा राग आल्याने सुलतानने शिवीगाळ आणि दमदाटी केली. लागलीच त्याचा भाऊ शाहरुख रहिमखान पठाण याला फोन लावून बोलावून घेतले. दोघं भावानी बार मालकाच्या तोंडावर, छातीवर लाथा बुक्यांनी मारहाण केली. नंतर सुलतानने मालकाचा गळा दाबून तोंडावर बुक्का मारला. त्यात त्यांचा चष्मा तुटला. त्याच्या खिश्यातून पैसे काढून घेतले. हातातील कडे काढून त्याचे तुकडे करून ते स्वतःच्या खिश्यात घातले. भांडण आवरण्यास आलेल्या आजूबाजूच्या दुकानदारांना देखील दमबाजी केली. बीयर बार मालकाच्या फिर्यादीवरून दोन्ही भावांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.