मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील पाडळसरे धरणावर पुरुष जातीचे प्रेत वाहून आले असून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिनांक २१ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तालुक्यातील पाडळसरे धरणाच्या काठावर एक प्रेत कुजलेल्या अवस्थेत गुराख्यांना दिसून आले. कुत्रे प्रेताचे लचके तोडत होते. गुराख्यानी पोलीस पाटील उमाकांत पाटील यांना कळवल्या नंतर त्यांनी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहा पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक व पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, सुनील तेली यांनी घटनास्थळी भेट दिली असता मयत पुरुषाच्या अंगावर कपडे नव्हते आणि त्याच्या शरीराला माश्यांनी खाल्ले होते. तो वाहून आलेला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील तेली करत आहेत. अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ताडे यांनी घटनास्थळी जात पोर्टमार्टम केले व सदर प्रेत वृध्द इसमाचे असल्याचा निष्कर्ष व्यक्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत मारवड पोलिसांनी तेथेच प्रेतावर अंत्यसंस्कार केले.