जिल्हा स्तरावरून आरोग्य विभागाच्या पथकाने डांगरी येथे केली पाहणी…
अमळनेर:- तालुक्यात पहिल्यांदाच लेप्टोस्पायरोसिस आजाराचा रुग्ण आढळून आला असून डांगरी येथील ४ वर्षाच्या बालकाला ही लागण झाली असून जिल्हा स्तरावरून आरोग्य विभागाचे पथकाने काल दिनांक २३ रोजी डांगरी येथे भेट देत पाहणी केली.
रोगबाधित प्राण्यांच्या लघवीतून लेप्टोस्पायरोसिस नावाच्या या रोगाचा प्रसार होत असून हा आजारात तीव्र ताप, अंगदुखी, डोळे लालसर होणे, तीव्र डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात, ह्या रोगाचे रुग्ण मुख्यत्वे करून भात व ऊस लागवडीच्या क्षेत्रात तसेच ठाणे, रत्नागिरी, रायगड, पालघर आदी भागात आढळून येतात. तालुक्यात प्रथमच ह्या रोगाचा रुग्ण आढळून आला असून ४ वर्षाच्या बालकाला लागण झाली होती. सदर कुटुंबीय उसतोडीसाठी बाहेर जिल्ह्यात गेले होते. परत आल्यानंतर कुटुंबातील ४ वर्षाच्या बालक आजारी पडल्याने धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी हे निदान करण्यात आले. सध्या उपचार घेवून बालक व कुटुंबीय घरी पोहचले असून बालकाची प्रकृती स्थिर आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन बहेकर यांच्या सूचनेवरून जिल्हा साथरोग अधिकारी प्रमोद पांढरे व डॉ. वाभळे, हिवताप नियंत्रण विभागाचे आरोग्य सहायक विपुल लोणारी व धनराज सपकाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, डॉ. रणाळकर यांच्यासह पथकाने डांगरी येथे भेट देत पाहणी केली. सदर कुटुंबियात कोणतीही लक्षणे आढळून आली नसून त्या बालकाची ही प्रकृती स्वस्थ असल्याचे पथकाने सांगितले.
प्रतिक्रिया:-
लेप्टोस्पायरोसिस नावाचा हा आजार दूषित पाण्यापासून होणारा व जनावरांच्या मुत्राद्वारे पसरणारा रोग आहे. सदर बालकाची प्रकृती उत्तम असून कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नसली तरी पुढील १४ दिवस डांगरी गावात सर्व्हे करण्यात येणार आहे. गुरांची ही तपासणी करण्यात यावी अशी सूचना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना करण्यात येणार आहे. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.
:- डॉ. गिरीश गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी, अमळनेर