
किसान काँग्रेसने प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन…
अमळनेर:- अमळनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करून कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी शासनाने उपाययोजना करावी अशी मागणी किसान काँग्रेस कडून अमळनेर येथे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना देण्यात आलेल्या या निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यात मागील अडीच महिन्यात सरासरीच्या पन्नास टक्के ही पाऊस झालेला नाही. ऑगस्ट महिन्यात कुठेही पुरेसा पाऊस झालेला नसून पिके सलाईनवर आहेत. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याचे चित्र असून शेतकऱ्यांचा खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी शासनाकडून उपाययोजना करण्यात यावी. कांदा निर्यातीवरील ४० टक्के कर तात्काळ रद्द करून चार हजार रुपये हमीभाव जाहीर करावा. तसेच सरदार खतांमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी आग्रही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सदर निवेदन देतेवेळी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, भैय्यासाहेब पाटील, प्रेमराज पाटील, संदीप मल्हारी पाटील, नीलकंठ पाटील, मयूर पाटील, गिरीश पाटील, भैय्यासाहेब पाटील, सुनील पाटील यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.







