डॉ नरेंद्र शांताराम पाटील यांच्या निवडीने खान्देशवासीयांनी व्यक्त केला आनंद
अमळनेर:- तालुक्यातील मालपूर येथील मूळ रहिवासी असलेले डॉ नरेंद्र शांताराम पाटील यांची गुजरात मधील सुरत महापालिकेच्या उपमहापौरपदी निवड झाल्याने तालुक्यात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ नरेंद्र पाटील हे उदना लिंबायत भागात नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. डॉ नरेंद्र आणि त्यांच्या पत्नी गेल्या २५ वर्षांपासून भाजपचे पदाधिकारी असून समाजसेवेत अग्रेसर आहेत. तसेच ते वैद्यकीय व्यवसायातून देखील जनतेची सेवा करत आहेत. त्यांच्या जनसेवा वृत्तीमुळेच पक्षाच्या वरिष्ठांनी प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या निर्देशानुसार त्यांच्यावर सुरत महापालिकेची उपमहापौर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. डॉ नरेंद्र पाटील यांच्या निवडीने खान्देशातील गुजरात येथील नागरिकांच्या समस्या सुटण्यास मार्ग सुकर झाला असल्याने खान्देशवासीयांना आनंद झाला आहे.
मालपूर सारख्या एका लहान गावातील अहिराणी भाषिक व्यक्तीला गुजरात मधील मोठ्या शहराची उपमहापौर पदाची जबाबदारी दिल्यामुळे नरेंद्र पाटील यांच्यामुळे अमळनेर तालुक्याची मान उंचावली आहे. त्यांच्यावर तालुक्यातुन सह संपूर्ण खान्देशातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.