
कुटुंबासह गणेशोत्सव साजरा करण्याचे शांतता कमिटीच्या बैठकीत आवाहन…
अमळनेर:- रात्री नऊनंतर अमळनेरहून फोन आला की भीती वाटते, विसर्जन मिरवणुकीत असुरक्षिततेमुळे आपल्या आई बहिणीला आणायला भीती वाटते, त्याला कारणीभूत आपणच आहोत. त्यामुळे सर्व कुटुंबासह गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांनी अमळनेर येथील वाणी मंगल कार्यालयात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत केले.

व्यासपीठावर माजी आमदार स्मिता वाघ, तिलोत्तमा पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, प्रांताधिकारी महादेव खेडकर, डीवायएसपी सुनिल नंदवाळकर,पोलिस निरीक्षक विजय शिंदे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रांजल पाटील, मारवड पोस्टेचे सपोनि शितलकुमार नाईक,सरकारी वकील ऍड शशिकांत पाटील हजर होते.

पोलीस अधीक्षक पुढे म्हणाले की, गणेशोत्सवात मशिदिजवळ व ईदला मंदिराजवळ जास्त बंदोबस्त लावावा लागतो याची खंत वाटते. माजी आमदार स्मिता वाघ म्हणाल्या की कमी आवाजाच्या अटीवर डीजेला परवानगी द्या आणि भक्तांनी उत्सवात गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी. प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी परवानगी घेऊनच उत्सव साजरा करा,वादविवाद टाळा सहकार्य करा, असे आवाहन केले. मुख्याधिकारी सरोदे यांनी विसर्जन मार्गावरील रस्ते दुरुस्त करून काही अडचणी येणार नाहीत याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले. तर उत्कृष्ट मंडळास बक्षिसे दिले जातील असे जाहीर केले. प्रास्ताविक करताना पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी एकूण १४२ मंडळ असून त्यात सात खाजगी, पाचव्या दिवशी १०, सातव्या दिवशी २१, आठव्या दिवशी १७, नवव्या दिवशी ३९, आणि अखेरच्या दिवशी ७४ मंडळाचे विसर्जन होईल असे सांगितले. ॲड व्ही आर पाटील, ॲड शकील काझी,तिलोत्तमा पाटील, इम्रान खाटीक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रवीण पाटील, विजय पाटील,मनोज शिंगाणे, धनंजय सोनार, शीतल देशमुख, प्रा अशोक पवार यांनी समस्या मांडल्या. यावेळी संजय पाटील यांनी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघातर्फे शिस्तीत व कायद्यात विसर्जन करणाऱ्या मंडळांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देवून गौरव करू, असे जाहीर केले. सूत्रसंचालन शरद पाटील व आभार डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांनी मानले.




