
तातडीने पंचनामे करून अहवाल मागविण्याचे मंत्र्यांनी दिले आदेश…
अमळनेर:- आधी दुष्काळाने फटका दिल्यानंतर तालुक्यात अतिवृष्टी आणि पुराने तालुक्यातील काही गावातील २६१ हेक्टर शेती पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सुरुवातीला दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना दोन तीन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने दिलासा मिळेल असे वाटले होते. मात्र अतिवृष्टीने शेतांमध्ये पाणीच पाणी झाले तर तापी नदीला आलेल्या महापुरामुळे नदी काठी असलेल्या शेतांमध्ये पुराचे पाणी घुसून पिके पाण्यात बुडाली आहेत. निम शिवारात तापी नदीचे पाणी घुसून गंगाराम धनराज कोळी यांचे ४ एकर क्षेत्रातील कापूस पीक पाण्यात बुडाले आणि शेती पंप व पाईप देखील वाहून गेल्याने त्यांचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. तर इंदूबाई धुडकू कोळी यांच्याही २ एकर क्षेत्राच्या कापसाची पिके पाण्यात बुडून एक लाखाचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील तापी नदी काठावरील निम, कलाली, दोधवद, हिंगोणे सिम, बोहरा, सावखेडा, धावडे, कामतवाडी, धुरखेडा, खापरखेडा, गंगापुरी, मुंगसे, दापोरी बु, रुंधाटी, मठगव्हाण या १६ गावांमधील कापूस पिकांचे नुकसान झाले आहे.
एकूण १५५.५० हेक्टर कापूस, २५.८० हेक्टर मका, २७.५० हेक्टर ज्वारी, २४ हेक्टर बाजरी,१६.५० हेक्टर फळपिके व १२ हेक्टर सोयाबीन असे एकूण २६१.३० हेक्टर शेतीपिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
कामतवाडी शिवारात ५० हेक्टर व धुरखेडा शिवारात ४० हेक्टर प्रमाणे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने मदत जाहीर करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रतिक्रिया…
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करता यावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामा करून अहवाल मागवण्याचे आदेश दिले आहेत.
:- अनिल भाईदास पाटील, मंत्री – मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन




