मराठा समाजातर्फे गुणवंत व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न…
अमळनेर:-महाराष्ट्राच्या काळ्या मातीत जन्मतो आणि या मातीत जो इमानाने राबतो तो म्हणजे मराठा,ज्ञानी व संयमी असतो तो म्हणजे मराठा,न्याय समता आणि बंधुता म्हणजे मराठा आणि हीच ओळख मराठा म्हणून राहिल्यास जातीपातीचा प्रश्न कधी राहणार नाही,अमळनेर तालुका मराठा समाजाने याच धोरणाने सर्व समाजातील घटकांचा सत्कार समारंभ आयोजित करून अभिमानास्पद कार्य केल्याची भावना मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केली.
मराठा समाजातील १० वी, १२ वी तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गुणवंतांचा तसेच अमळनेरचे प्रथम मंत्री ना.अनिल भाईदास पाटील व विविध संस्थांमध्ये निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ काल रविवार दि १७ रोजी कै सुंदरबाई दिनकरराव देशमुख मराठा मंगल कार्यालय, अमळनेर येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदार अनिल भाईदास पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता उदय वाघ, उद्योजक शालिग्राम पाटील, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे उपसंचालक कपिल जयकर पवार,माजी नगराध्यक्ष विनोद भैय्या पाटील,प्रभाकर नारायण पाटील,अर्बन बँकेचे चेअरमन मोहन सातपुते,मार्केटचे सभापती अशोक पाटील, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत उपस्थित होते. यावेळी सुरवातीला छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाल्यानंतर मुख्य सत्कारार्थी मंत्री ना. अनिल पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला.त्यानंतर प्रास्तविक मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना नामदार अनिल पाटील पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात मुलांनी उज्वल भविष्य करून आपल्या तालुक्याचे आणि मतदारसंघाचे नाव उज्वल करावे, आमच्या भूमीतील विद्यार्थी यशवंत, गुणवंत आणि प्रतिभावंत झाला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष महत्वाचा असतो त्यानंतरच व्यक्ती किर्तीवंत होत असतो,आपल्या भूमीतील शेतकरीही सक्षम करणे आवश्यक आहे. आपल्या पाडळसरे धरणाला 4891 कोटीची सुधारित मान्यता पुढील महिन्यात मिळणारच हा शब्द उपमुख्यमंत्री ना अजित दादानी दिला आहे. त्यानंतर निधीसाठी पुढील प्रवासही गतीने होईल, दहा महिन्यात धरणाच्या वरच्या बाजूला आपण नारळ नक्की फोडणार अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी खानदेशचे सुपूत्र तथा उद्योजक शालिग्राम पाटील यांनी समाजाला 1 लाख 1 हजारांची देणगी जाहीर केली.
माजी आमदार स्मिता वाघ यांनी सर्वांचाच सत्कार हा चांगला पायंडा असून असे उपक्रम झाले पाहिजे,मुलांनी ध्येय निश्चिती केल्यास नक्कीच शिखर गाठता येते अश्या कार्यक्रमांनी त्यांना ऊर्जा मिळते,मुलांमध्ये गट्स आहे त्यास केवळ दिशा दिली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.माजी आमदार साहेबराव पाटील यांनी मराठा समाजाने आज अनेकांचे सत्कार केले तसेच यापूढे आदर्श शेतकऱ्यांचेही सत्कार झाले पाहिजेत. त्याग हेच जीवन आहे, मी आता राजकारण सोडलं आहे. आता राजकारणात येणारच नाही मात्र चांगले काम करीत राहील. महिला भगिनींनी महादेवाला पाणी टाकायला जाताना वाटेत कधी वड, औदुंबर सारखी झाडेही सर्वांनी लावा लावा,आमचा मंत्री अनिल दादांवर खूप विश्वास आहे,फक्त काहीही करा धरण पूर्ण करा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी मनोगत व्यक्त करत मराठा समाजासाठी 51 हजारांची देणगी जाहीर केली.
यशस्वी होण्यासाठी निर्भीड व धाडसी व्हा:-कपिल पवार…
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे उपसंचालक कपिल पवार मार्गदर्शन करताना म्हणाले की, यशस्वी होण्यासाठी समाजाचा पेपर ओळखा आणि त्यासाठी प्रतिभावंत व्हा,यशस्वी होण्यासाठी निर्भीड व धाडसी व्हावे, यशस्वी होताना आपली जहागिरी नव्हे तर आपलं काळीज महत्वाचे असते,बापाने आपले काळीज मोठे ठेवावे, मुलांना त्यांचे दाखले काढण्याचे काम स्वतः करू द्यावे, आता प्रचंड स्पर्धा दिसत आहे,मात्र कौशल्यवान मुलांची आजही कमतरता आहे,त्यासाठी मुलांना ऑल राऊंडर करा,आपली स्पर्धा जगाशी आहे,शारीरिक आणि बौद्धिक दृष्ट्या मुलगा प्रगल्भ झाला पाहिजे, त्याला छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचे चरित्र वाचायला द्या, आपलं नाव लावण्यासाठी कोणतेच काम करू नका,ज्यात इंटरेस्ट असेल तेच करा,मुलांना तारतम्य शिकवा चार लोक काय म्हणतील याची काळजी करू नका, मुलींनी बापाची जाण ठेवावी, आई वडीलांची मान खाली जाणार नाही याची काळजी घ्यावी,कोणतीही गोष्ट उत्कृष्ट करा असा सल्ला देत अमळनेर येथे करिअर कौन्सिलिंग सेंटर सुरू करण्याचे संकेत दिले.
यावेळी मराठा समाजातील १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थी, उत्कृष्ठ पत्रकार संघ पुरस्कार प्राप्त अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालक मंडळ, खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष व सर्व पदाधिकारी, अर्बन बँकेचे चेअरमन व सर्व संचालक मंडळ, श्री छत्रपती मराठा समाज पतपेढीचे चेअरमन व संचालक मंडळ,नवनियुक्त पोलीस पाटील , ग्रामविकास शिक्षण संस्था मुडीचे नवनियुक्त संचालक ,मारवड संस्थेचे नवनियुक्त संचालक मंडळ आदींचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमळनेर तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील व सर्व कार्यकारी मंडळाने परिश्रम घेतले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाजबांधव व महिला भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.