वृद्ध आई वडिलांना त्यांच्या मुलामुलींनी खावटी देण्याचे दिले आदेश…
अमळनेर:- दत्तक घेतलेल्या भाच्याने उदरनिर्वाह करण्यास नकार दिल्याने त्याला बक्षीसपत्र करून दिलेल्या मालमत्तेचे दस्तऐवज रद्द करण्याचे आदेश जेष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिल्याने ७३ वर्षीय वृद्धेला न्याय मिळाला आहे. जेष्ठ नागरिक निर्वाह कायद्यानुसार खेडकर यांनी आणखी दोन वेगवेगळ्या वृद्ध कुटुंबांना त्यांच्या मुले व मुलींनी खावटी देण्याचे आदेश दिले आहेत.
तालुक्यातील पिंपळी येथील सारजाबाई उर्फ सायजाबाई मोतीराम महाजन (वय ७३) यांना मुलबाळ नसल्याने त्यांनी आपल्या भावाचा मुलगा जितेंद्र मोतीराम उर्फ मोतीलाल महाजन रा बडोदा याला दत्तक घेतले होते. २०१६ मध्ये सारजाबाईने दोन बक्षिसपत्र करून आपल्या मिळकती जितेंद्रच्या नावाने करून दिल्या होत्या. मात्र जितेंद्रने २०२२ पासून सारजाबाईला त्रास द्यायला सुरुवात केली आणि १५ फेब्रुवारी २०२२ मध्ये घरातून हाकलून दिले. तेव्हापासून ती नातेवाईकांकडे राहत होती. जेष्ठ नागरिक निर्वाह कायद्यानुसार सारजाबाईने उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्याकडे तक्रार करून बक्षिस केलेली मालमत्ता परत स्वतःच्या नावावर करून द्यावी आणि ५० हजार रुपये महिना खावटी द्यावी अशी मागणी केली होती. त्यावर दोन्ही बाजूने सुनावणी होऊन खेडकर यांनी एक बक्षिसपत्र रद्द करून ती मालमत्ता वृद्धेच्या नावावर करण्याचे आदेश दिले आहेत.
भरवस येथील भानुदास दामू पाटील (सोनवणे) वय ८३ व मालतीबाई भानुदास पाटील (वय ७५) यांनी तक्रार केली होती की, त्यांना मुकुंदराज भानुदास पाटील (रा अभोणा ता कळवण जि नाशिक) व तुळशीदास भानुदास पाटील (रा शास्त्री नगर आभोणा ता कळवण जि नाशिक) हे दोन मुले व अलका अशोक हिंगे (रा नांदुरी रोड आभोणा ता कळवण जि नाशिक) ही मुलगी असून मुले मला नियमित दरमहा उदरनिर्वाहासाठी दहा हजार रुपये देतात मात्र मुलीने २६ नोव्हेंबर २०२० मध्ये फसवणूक करून बक्षिसपत्र करून शेत स्वतःच्या नावे करून घेतले होते. हे बक्षिसपत्र रद्द करून शेत आमच्या वृद्ध दाम्पत्याच्या नावे करून द्यावे तसेच मुलीने घेतलेले अडीच लाख रुपये परत करावेत आणि तिच्याकडून ५ हजार रुपये दरमहा खावटी मिळावी अशी मागणी केली होती. यावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणात वृद्ध दाम्पत्याने मुलांना दिलेली मालमत्ता परत मागितली नाही फक्त मुलीकडूनच परत मागितली असे निदर्शनास आल्याने खेडकर यांनी दोन्ही मुले व मुलीने प्रत्येकी पाच हजार रुपये खावटी देण्याचे आदेश दिले आहेत.
तिसऱ्या प्रकरणात श्रीराम महिपत पाटील (वय ७८ रा तळवाडे) यांनी तक्रार केली की त्यांना अशोक, निंबा, मनोहर आणि सतीलाल अशी चार मुले आहेत. शेतजमीन चारही मुलांच्या ताब्यात असल्याने उदरनिर्वाहासाठी तिचे पाच हिस्से करण्यात यावेत आणि प्रत्येकी आठ हजार रुपये खावटी मिळावी अशी मागणी केली. यावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्या नंतर शेत जमिनीचे पाच समान हिस्से करून पाचवा हिस्सा वडील श्रीराम पाटलांना द्यावा आणि प्रत्येकाने औषधोपचारसाठी एक हजार रुपये वडिलांना द्यावेत असे आदेश दिले आहेत.