
किशोरवयीन मुलींसाठी “कळी उमलतांना” विषयावर व्याख्यान संपन्न…
अमळनेर:- येथे नव्याने स्थापित जायन्ट्स ग्रुप हा विविध सामाजिक उपक्रमांनी जायन्ट्स सप्ताह साजरा करीत आहे. यानिमित्ताने धनदाई एज्युकेशन सोसायटी अमळनेर येथे दिनांक २३ रोजी डॉ. सौ.मयुरी विक्रांत पाटील (प्रसूती व स्त्री रोग तज्ञ) यांचे जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगना आणि जायन्ट्स ग्रुप ऑफ जिजाऊ, अमळनेर तर्फे किशोरवयीन मुलींसाठी कळी उमळतांना या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले.

डॉ.मयुरी यांनी किशोरवयीन मुलींना वयात येताना शरीरातील बदल, मानसिकतेत बदल, मासिक पाळीच्या अडचणी, हार्मोनल चेंजेस नेमके काय असतात ? त्याबद्दल मोकळेपणाने बोलायला हवं याबद्दल सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून के डी पाटील (उपाध्यक्ष, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी तथा प्राचार्य जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर) आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.विक्रांत पाटील हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोजेक्ट चेअरमन नयना पाटील (डायरेक्टर ऑफ वीरांगना सहेली) यांनी केले. वीरांगना सहेली ग्रुपच्या अध्यक्ष दिपिका सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. जिजाऊ सहेली ग्रुप अध्यक्ष स्नेहलता पाटील यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थिनी, वीरांगना व जिजाऊ सहेलीच्या सदस्य व धनदाई एज्युकेशन सोसायटीच्या प्राध्यापिका उपस्थित होत्या.




