सर्पदंशाच्या घटनेनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती…
अमळनेर:- रुग्णांना व्हेंटिलेटर सुविधा देण्यासाठी रुग्णालयात आयसीयू कक्ष आवश्यक आवश्यक असून सदर आयसीयु कक्ष कोणत्याही 30 अथवा 50 खाटांच्या ग्रामिण रुग्णालय तथा उपजिल्हा रुग्णालयाच्या आकृती बंधात मंजूर नाही,त्यामुळे अमळनेर ग्रामिण रुग्णालयात देखील ही सुविधा रुग्णांना मिळू शकत नाही अशी माहिती अमळनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली.
अमळनेर तालुक्यातील दोघांचा या महिन्यात सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याने सदर रुग्णांना अमळनेर ग्रामिण रुग्णालयात व्हेंटिलेटर का उपलब्ध झाले नाही ? याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते त्यावर खुलासा करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रांजल पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे व मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप जोशी उपस्थित होते.डॉ. ताडे यांनी रुग्णालयाच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, अमळनेर ग्रामीण रुग्णालय हे ३० सामान्य खाटांचे प्रथम संदर्भ सेवा केंद्र असुन येथे त्याचा मुख्य उद्देश प्राथमिक आरोग्य केंद्रातून येणारे प्रसुती व बालके यांना स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ या विशेष तज्ञ सेवा देणे हा आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपलब्ध नसलेल्या रक्त तपासण्या, क्ष-किरण सेवा, रुग्णवाहिका सेवा येथून दिल्या जातात व इतर सामान्य आजारांवर उपचार करण्यात येतात आणि गंभीर रुग्णांना प्राथमिक उपचार करुन संदर्भ सेवा दिली जाते. ६ खाटांचा आयसीयु कक्ष फक्त जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त १८ कर्मचारी वर्गांसह कार्यान्वित करण्यात आलेला असतो. तसेच व्हेन्टीलेटरवर असणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या अतिरिक्त रक्त चाचण्यांची सुविधाही तेथे उपलब्ध असते. त्यामुळे सर्व तालुका स्तरावरील गंभीर रुग्ण यांना आयसीयूत दाखल करण्याची आवश्यकता असते. अथवा दाखल करण्याची गरज पडु शकते, अशा रुग्णांना जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन संदर्भित केले जाते. अमळनेर ग्रामिण रुग्णालयात कोवीड काळात व्हेन्टीलेटर उपलब्ध करण्यात आले होते. परंतु, त्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अतिरिक्त डॉक्टर्स, सिस्टर्स, वार्ड बॉय नियुक्त करण्यात आले होते. तो अतिरिक्त स्टाफ आता कार्यमुक्त करण्यात आलेला आहे.त्यामुळे ती सुविधा आता देता येऊ शकत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तालुका ग्रामीण रुग्णालयात समन्वय साधण्यासाठी लवकरच कार्यशाळा घेण्यात येईल अशी माहिती डॉ. ताडे यांनी दिली.
सर्पदंश रुग्णांबाबत दिली महत्वपूर्ण माहिती…
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने सर्पदंशाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे याबाबत अधिक माहिती देताना डॉ ताडे म्हणाले की गेल्या ६ महिन्यात अमळनेर ग्रामीण रुग्णालयात ६९ सर्प दंश व २६ अज्ञात दंश रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत. सर्पदंशची लस २४ तास विना मुल्य उपलब्ध असते व आवश्यकतेनुसार सर्व रुग्णांना दिली जाते व ज्या रुग्णांना आयसीयूत दाखल करण्याची आवश्यकता असते. त्यांना जिल्हा रुग्णालयात संदर्भित केले जाते. प्रत्यक्षात लस घेवूनही सर्वच गंभीर रुग्ण बरे होतील, असे होत नाही. सर्पदंशाचे बहुतांशी रुग्ण बिनविषारी असतात व वर्षभरात विषारी सर्पदंशाचे सरासरी २ ते ३ रुग्ण मृतावस्थेत दाखल होतात व तेवढेच गंभीर अवस्थेत दाखल होतात. सर्वच रुग्ण बरे व्हावे या उद्देशाने तात्काळ उपचार केले जातात. काही रुग्ण अशास्त्रीय पध्दत वापरुन अथवा सर्पदंशाचा अंदाज न आल्याने उशिराने दाखल होतात.सर्व ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश उपचाराबाबत एकसारखीच उपचार पध्दती वापरली जात असते. कोणत्याही परिस्थितीत रुग्णांना वाचविणे हाच मुख्य उद्देश सर्व डॉक्टरांचा असतो असेही त्यांनी आवर्जून सांगितले.यावेळी डॉ संदीप जोशी यांनी देखील महत्वपूर्ण माहिती दिली.
50 खाटांचे रुग्णालय कधी होणार ???
सद्यस्थितीत 30 खाटांचे असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे आहे त्याच जागेवर श्रेणीवर्धन करून 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय करण्यास शासनाने काही वर्षांपूर्वी मंजुरी दिली आहे.त्यासाठी निधीही प्राप्त झाला होता. मागील काळातील लोकप्रतिनिधींनी त्याचे श्रेय घेत बातम्या ही छापून आणल्या होत्या. मात्र त्यानंतर कोणतीच हालचाल झाली नाही. मात्र तो निधी अजून शिल्लक आहे की परत गेला? आणि परत जाण्याचे कारण काय? याबाबत अधिक माहिती देण्यास वैद्यकीय अधिकारी असमर्थ ठरले.सदर विलंबामुळे मोठ्या लोकसंख्येच्या अमळनेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय अनेक वर्षांपासून आहे त्याच स्थितीत असून यामुळे रुग्णांना त्या दर्जाच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. तरी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालून लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.