अमळनेर येथील शारदीय व्याख्यानमालेचा समारोप…
अमळनेर:- “दिवंगत ना धो महानोर एक कवी होते आणि कवी कधी दिवंगत होत नसतात ते इथेच कुठे आपल्यात असतात म्हणून आज महानोरांना श्रद्धांजली नव्हे तर त्यांच्याच शब्दात स्वरांजली अर्पण करीत आहोत” अशा शब्दात भावना व्यक्त करून परिवर्तन नाट्य संस्थेचे शंभू पाटील यांनी अमळनेर येथील शारदीय व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प गुंफताना ‛कंठ दाटून आला’ या कार्यक्रमातून महानोरांच्या कविता, गीतातून त्यांना स्वरांजली अर्पण केली. मराठी वाङ्मय मंडळ आणि कै अपासाहेब र का केले सार्वजनिक वाचनालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात शारदीय व्यख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.
हर्षल पाटील व शंभू पाटील यांच्या टीमने संगीत आणि गीतातून कवी नाधो महानोर यांच्या स्वभाव, जीवनाचा, निसर्ग प्रेमाचा आढावा घेतला. अक्षय गजभिये यांनी खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजींच्या प्रार्थनेने सुरुवात केली. मधूनच प्रत्येक कवितेनंतर महानोर यांचा जीवनपट मांडताना शंभू पाटील म्हणाले की, महानोरानी प्रेम करायला शिकवले , ऐश्वर्या परदेशी यांनी ‛नभ उतरू आले…अंग झिम्माड झाले’ ही कविता सादर केली. शंभू पाटील म्हणाले की, महानोरांनी मिश्र भाषेत कविता केल्याने ते टिकून राहिले. पाऊस आणि माती यांचे मिलन ऐश्वर्या आणि वरूण नेवे यांनी ‛चिंब पावसाने रान झाले आबादानी….’ या कवितेतून व्यक्त केले. नाधो हा पहिला कवी होता ज्याने निसर्ग आणि माणूस जोडला. रमेश पवार यांनी ‛या नभाने या भुईला दान द्यावे …’ही कविता सादर केली. त्यांनतर सोनाली पाटील यांनी ‛मोडलेल्या माणसांचे दुःख झेलतांना’ ही कविता सादर केली. शंभू पाटील म्हणाले की, महानोरानी वास्तव जगात आपले पाय रोवले होते. कॉलेज सोडून ते शेती करायला गावी गेले. त्यांनतर वरुणने मी गातांना….गीत तुला लडिवाळा, हा कंठ दाटून झाला हे अंगाई गीत सादर केले. सुदीप्ता सरकार यांनी ‛जग जेठी भरली तिची ओटी ’ ही डोहाळे गीत सादर केले. हर्षल पाटील यांनी ‛फुलात न्हाली पहाट ओली’ ही कविता सादर केली. आरुषी जोशी यांनी ‛जन्मापासून चे दुःख असे जन्मभर रहावे’ ही कविता सादर केली. ऐश्वर्या ने जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजती..हे गीत सादर केले. वरूण ने ‛लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला…’ हे गीत सादर केले. प्रास्ताविक मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी यांनी केले. संदीप घोरपडे यांनी ‛परिवर्तन’ व कलाकारांचा परिचय करून दिला.