ठाकरे सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप करून प्रतिमेला मारले जोडे…
अमळनेर:- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द केल्याने या निर्णयाचे अमळनेर भाजपतर्फे स्वागत करण्यात आले. तर शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या शासनाने हा निर्णय घेतल्याचा आरोप करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत व प्रतिमा जाळून आंदोलन करण्यात आले.
कंत्राटी नोकर भरतीचा जीआर जाहीर झाल्यानंतर शैक्षणिकसह विविध घटकांकडून त्याला प्रचंड विरोध झाला. अखेर हा कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द केल्याचे काल जाहीर केले. या भाजप व शिंदे सरकारने घेतलेल्या निर्णयाचे अमळनेर येथील भारतीय जनता पार्टीतर्फे शनिवारी स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार स्मिताताई वाघ, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जिवन पाटील, श्याम अहिरे, भारती सोनवणे, हिरालाल पाटील, प्रफुल्ल पाटील, जिजाबराव पाटील,दिलीप ठाकूर, महेश पाटील, महेंद्र पाटील, माधुरी पाटील, श्रीनिवास पाटील,पंकज भोई,सौरभ पाटील, भूषण जैन आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी आमदार स्मिता वाघ म्हणाल्या, कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय हा तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणसह उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सरकारच्या कार्यकाळात घेण्यात आला होता. मात्र त्याचे खापर भाजप-शिंदे आणि अजित पवार या सरकारच्या माथी मारण्यात आले. चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा हा प्रकार आहे. म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय स्वागतहार्य आहे,असे त्या म्हणाल्या. यावेळी उपस्थित नेते आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, उद्धव ठाकरे, शरद पवार मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा विविध घोषणा दिल्या.