केंद्राच्या योजनेत समावेशासाठी प्रयत्न करणार असल्याचा पत्रकार परिषदेत खुलासा…
अमळनेर:- केंद्रीय जलआयोगाची मान्यता मिळाली असती तर लोंढे वरखेडे, शेळगाव बॅरेजला केंद्राकडून बळीराजा सिंचन योजनेतून पैसे मिळाले तेव्हाच निम्न तापी प्रकल्पाला पैसा मिळाला असता, मात्र येत्या काही दिवसांत नवीन सुप्रमा मिळणार असून त्यानंतर केंद्राच्या योजनेत प्रकल्पाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू होतील, असा खुलासा खासदार उन्मेष पाटील यांनी अमळनेर येथे पत्रकार परिषदेत केला.
शासकीय अधिकाऱ्यांकडून सुधारित प्रशासकीय मान्यता साठी अडचणी निर्माण होतात. पाठपुरावा होत नाही म्हणून खासदार उन्मेष पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पाडळसरे धरणाचा दुर्दैवी प्रवास कथन करताना त्यांनी कोविडचा विलंब, सरकार बदल, नन्तर बळीराजा सिंचन योजनेत समावेश होण्यासाठी प्रकल्प ४० टक्के पूर्ण असल्याची अट गरजेची होती त्यावेळी निम्न तापी पाडळसरे प्रकल्प ४० टक्के झालेला नव्हता. अशा अडचणी आल्याचे सांगितले. नंतरच्या काळात अजित पवार आणि अनिल पाटील सत्तेत आले. मग सर्वांनी पाठपुरावा केला. परंतु उपलब्ध पाणी साठा आणि परवानगी यात तफावत ही अडचण आली. पुन्हा पाठपुरावा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस , गिरीश महाजन यांच्या भेटी घेतल्या. अनिल पाटील यांनी अजित पवारांकडे पाठपुरावा सुरू केला. त्यांनतर जलसंपदा अर्थ आणि नियोजन विभागाच्या बैठका झाल्या. मी स्वतः वेळा प्रश्न विचारला, उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक घेतली तेव्हा देखील या प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्याची मागणी केली मात्र त्यानी लक्ष दिले नाही. नंतर केंद्रीय मंत्री शेखावत यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी बैठक घेऊन विचारणा केली. शेखावत यांनी निम्न तापी प्रकल्प ग्रीन लिस्ट मध्ये टाकण्याच्या सूचना दिल्या. ठाकरे सरकारच्या काळात पश्चिम महाराष्ट्राला प्राधान्य दिले. खान्देशकडे दुर्लक्ष केले असा आरोप त्यांनी केले. अमळनेर तालुक्यात सिंचन फक्त १५ टक्के आहे. त्यामुळे पाण्याची नितांत गरज आहे. असे नमुद करत संकल्प चित्राबाबत चुकीची माहिती देण्यात आली त्यात प्रकल्पाचे स्तंभांचे काही भाग पाडण्यात आले ते नुकसान झाले. परत आयआयटी पवईचे पत्र आले की संकल्प चित्र योग्य आहे त्यात बदल करण्याची गरज नाही, याबाबत दुर्लक्षच झाल्याची कबुली दिली. मात्र मी २२ स्मरणपत्रे पाठपुराव्यासाठी दिले आहेत. प्रकल्पाच्या व्याप्तीत बदल करू नका असे सांगितले आहे. तापी खोऱ्याचे दुर्दैव आहे की आपल्याला राजकीय आश्रय मिळाला नाही, अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. नांदेडकर सभागृहात यावेळी खासदार उन्मेष पाटील यांच्यासोबत ॲड व्हि आर पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, माजी सभापती किशोर पाटील, प्रफुल्ल पवार, जिजाबराव पाटील, अर्जुन परदेशी आदी उपस्थित होते.