निवेदन देताना मारवड येथे शेतकरी नेते आणि मंत्र्यात बाचाबाची…
अमळनेर:- तालुक्यात मारवड येथे दुष्काळाबाबत निवेदन देताना शेतकरी नेते शिवाजी पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यानतंर बुट ठोकणे, दंड थोपटणे असे प्रकार झाल्याने याची काल दिवसभर चर्चा रंगली होती.
निम येथील कपिलेश्वर मंदिराच्या सभागृह आणि पांझरा नदीवरील पादचारी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील सोबतच मारवड मार्गे कपिलेश्वर मंदिरावर जात असताना मारवड गावात शेतकरी नेते शिवाजीराव पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांनी मंत्र्यांच्या वाहनाचा ताफा अडवला. अमळनेर तालुक्यात अनेक दिवस पावसाचा खंड होता, पुरेसा पाऊस पडला नाही तरी अद्याप तालुका दुष्काळी का जाहीर होत नाही, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तीन महिने उलटले तरी मिळत नाही अशा मागणीचे निवेदन दोघा मंत्र्यांना दिले. त्यावेळी कायदेशीर बाबी मंत्री अनिल पाटील गुलाबरावाना समजावून सांगत असताना मध्येच एकाने “ह्या काहीच करावं नाहीत” असे उपरोधक वक्तव्य केल्याने गुलाबराव चिडले. त्यांनी मी रस्त्यावरचा आहे नंतर मंत्री आहे असे चिडत वक्तव्य केले. त्यावर शिवाजी पाटील यांनी तुम्ही मंत्री आहात भडकू नका म्हणून सांगितल्यावर दोघांमध्ये खडाजंगी झाली. शाब्दिक चकमक जोरात होऊ लागताच मंत्री अनिल पाटील यांनी देखील संताप व्यक्त केला. यावेळी काही नागरिकानी व्हिडीओ चित्रिकरण देखील केले. पोलिसांनी अधिक वाद होऊ नये म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शिवाजी पाटील यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला बसवून ठेवले व मंत्र्यांचा ताफा कपिलेश्वर कडे रवाना झाला. दरम्यान गुलाबराव पाटील यांनी मंत्री असतानाही दमदाटी केली व दंड थोपटून आव्हान दिल्याचा तर अनिल पाटील यांनीही दमबाजी केल्याचा आरोप शिवाजी पाटील यांनी केला.
दरम्यान शिवाजी पाटील यांनी बेकायदेशीर रस्ता अडवला म्हणून त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली असल्याचे मारवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांनी सांगितले. शिवाजी पाटील यांना संध्याकाळी सात वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते.