काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत साधला सत्ताधाऱ्यांवर निशाणा…
अमळनेर:- देशातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकार हे रोजगार देणारी नव्हे तर रोजगार हिरावणारी सरकार असून युवकांना गुलामगिरीकडे नेण्याचा प्रयत्न या सरकारांकडून होत असल्याचा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेतून केला.
डॉ.अनिल शिंदे यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत पटोले बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील,जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार,जेष्ठ नेते डॉ.अनिल शिंदे, तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील उपस्थित होते.
यावेळी त्यांनी सरकारच्या कार्यशैलीवर चौफेर टीका केली. सरकारने गरीबांच हक्काचं शिक्षण हिरावण्याचा जणू विडा उचलला असून मराठी शाळा बंद पाडण्याचा विडा या सरकारने उचलल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेंशनच्या प्रश्नावर सकारात्मक उत्तर देत त्यांनी सांगितले की, देशात छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश या काँग्रेस शासित राज्यांमध्ये जुनी पेंशन योजना बहाल केली असून राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास जुनी पेन्शन योजना पहिल्याच कॅबिनेट मध्ये देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयातील काँग्रेस पक्षाच्या गटबाजीवर बोलतांना त्यांनी सांगितले की,पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम केल्यास पक्षाला चांगले दिवस येऊ शकतात. पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत देखील त्यांनी यावेळी दिले.
राज्याला अधोगतिकडे नेणारे हे ट्रिपल इंजिन सरकार असून जनता फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळली असून २०२४ नंतर राज्यात सत्ताबदल होणार असून काँग्रेसच्या विचारांचे सरकार सत्तेत येणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.