माजी नगरसेवकांनी केले मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन…
अमळनेर:- अमळनेर नगरपरीषदेमार्फत लोकवर्गणी एकाच मालमत्ता धारकांकडून वेगवेगळ्या मार्गे वसुली केली जात आहे. तसेच ३१ डिसेंबर २०२३ नंतर पाणीपट्टीला प्रति महा २ टक्के व्याज व त्या व्याजावर चक्रवाढ व्याज लावण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या तुघलकी धोरणाविरोधात व सर्वसामान्य जनतेची होणारी लूट थांबवण्यासाठी काल शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीतर्फे अमळनेर नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
नगरपरीषदेमार्फत लोकवर्गणी एकाच मालमत्ता धारकांकडून वेगवेगळ्या मार्गे वसुली केली जात आहे. ३१ डिसेंबर २०२३ नंतर पाणीपट्टीला २ टक्के व्याज व त्या व्याजावर चक्रवाढ व्याज लावण्याचे जे निर्णय झाले आहेत ते निर्णय रद्द करण्यासाठी ता. ०९ सप्टेंबर रोजी शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीतर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. ३१ डिसेंबर २ दिवसांवर आला आहे तरी या निर्णयाविरोधात आतापर्यंत मुख्यधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. अमळनेर नगरपरिषदेने घेतलेले सर्वसामान्य जनतेची लूट करणारे तुघलकी निर्णय त्वरित मागे घेण्यासाठी काल शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीतर्फे मुख्याधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान या अनोख्या आंदोलनानंतर नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सदर निर्णयास ३१ मार्च २०२४ पर्यंत स्थगिती देण्यासाठी नगर परिषद संचालनयाला तात्काळ प्रस्ताव पाठवण्यात येईल व त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, या आशयाचे लेखी यावेळी शिरीष चौधरी मित्र परिवार यांना देण्यात आले. आंदोलन करतेवेळी गटनेते बबली पाठक, भाऊसाहेब महाजन, बाळासाहेब संदानशिव, पंकज चौधरी, दिपक चौघुले, अविनाश जाधव, नरेश कांबळे, मनोज शिंगाणे, संतोष पाटील, राहुल कंजर, अतुल चौधरी आदीसह कार्यकर्ते ठिय्या आंदोलनाला बसले होते. लेखी पत्रानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.