अमळनेर:- पिंपळे बु. येथील श्री.चिंतामणी संकुलात बालसंसद निवडणूक उत्साहात संपन्न झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेत प्रत्यक्ष अनुभव घेतला.
संपूर्ण महाराष्ट्रभर ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम घेण्यात येत असून दि.१३ रोजी पिंपळे बुद्रुक येथील सु.अ. पाटील प्राथमिक व यशवंत माध्य. व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथे शालेय कामकाज मंत्रिमंडळ बाल संसद उपक्रम घेण्यात आला. शाळेतील मुलांना राज्याचा व देशाचा कारभार लोकशाही पद्धतीने कसा चालतो याची कल्पना दिली.त्याप्रमाणे शालेय कामकाज पाहण्यासाठी इच्छुक मुलांची यादी मागवण्यात आली आणि शालेय कामकाज मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, शालेय आरोग्य मंत्री, स्वच्छता मंत्री, क्रीडामंत्री या विविध पदांसाठी मुलांनी आपापला उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढविण्याचे ठरविले. प्रचार सभा घेऊन मतदारांना मत देण्यासाठी आवाहन केले. दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले. प्राथमिक विभाग ९६% व माध्यमिक विभाग ९८% मतदान झाले. मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये विजयी उमेदवारांनी जल्लोषात आनंद साजरा केला. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेऊन अनुभूती घेतली. या सर्व प्रक्रिया मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाल्या.