वर्षपूर्ती होऊन देखील पुरवठादारांना एक रुपयाही अनुदान प्राप्त नाही. मग पौष्टिक आहार पुरवठा होणार तरी कसा ?
अमळनेर– शहरातील 42 शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या तब्बल 11531 विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोषण आहार देण्यात येत आहे. या कामी तीन पुरवठादारांची नेमणूक करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना आहार गरम, ताजा आणि पौष्टिक मिळतोय काय? त्या आहाराची चव,वजन त्यामधील पौष्टिक घटक योग्य प्रमाणात आहेत काय? स्वयंपाक गृह स्वच्छ, आहार शिजवणारा स्वयंपाकी व मदतनीस निरोगी स्वच्छतेबाबत सजग असल्याची खातरजमा भरारी पथकातर्फे करण्यात येत असते.
मात्र आज पावतो भरारी पथकाची जबाबदारी ऑफिसमध्ये बसून किंवा इतरांच्या मदतीने तपासणी अहवाल भरणे चालू आहे. तिन्ही मक्तेदारांना एक वर्ष होऊन देखील एक रुपयाही अनुदान मिळाले नसल्यामुळे विद्यार्थी संख्या तसेच भरारी पथकाकडून कारवाई न करता शालेय पोषण योजनेचे अधिकारी व पुरवठादार संगनमताने करारनाम्यातील अटी शर्तींचा भंग करून निकृष्ट दर्जाचा पोषण आहार,कमी प्रमाणात देऊन तसेच पुरक आहार म्हणून आठवड्याचा एक वार स्थानिक फळ, राजगिरा लाडू,चिक्की, इत्यादी न देता सरसकट रोज खिचडीचा आहार देत आहेत. संबंधित अधिकारी व मक्तेदार शासनाला कागदोपत्री पूर्तता पूर्ण करून सर्व व्यवस्थित असल्याचे भासवून शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी हेडसाळ करत असल्याची चर्चा सध्या शिक्षक वर्गात सुरू आहे. शाळेत मिळणाऱ्या निकृष्ट पोषण आहाराबद्दल विद्यार्थी घरी पालकांकडे नेहमी तक्रारी करत असतात. तसेच सर्वच विद्यार्थी घरून आहाराचा डब्बा घेऊन जात असतात. सदर योजनेचा फायदा विद्यार्थ्यांना होत नसल्यामुळे शहरातील पालक वर्गात नाराजीचा सूर उमटला असून योग्य ती चौकशी करण्याची मागणी आता शहरात जोर धरू लागली आहे.
प्रतिक्रिया…
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे अनुदान वर्षभरापासून प्राप्त झालेले नाही. सदर अनुदानासाठी वरिष्ठ कार्यालयाशी पाठपुरावा सुरू आहे. तसेच मक्तेदारांना लवकरच अनुदान प्राप्त करून देण्यात येईल.- दिपाली पाटील, प्रशासन अधिकारी, नगरपरिषद शिक्षण मंडळ, अमळनेर
प्रतिक्रिया…
सदर योजनेचे वर्षभरापासून अनुदान प्राप्त झालेले नाही. मात्र करारनामा तीन वर्षाचा असल्याकारणाने आम्ही विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा सुरळीत पुरवठा करीत आहोत. शरद पाटील,पुरवठादार,साई प्रतिष्ठान, धुळे